
नवनीत बऱ्हाटे/ उल्हासनगर
उल्हासनगर शहरात काळ्या पैशाच्या अवैध व्यवहारांना मोठा हादरा बसला आहे. उल्हासनगर आणि कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत तब्बल १ कोटी ६ लाख ३५ हजार २५० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. हा पैसा हवाला व्यवहारातून हस्तांतरित केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. उल्हासनगर-२ मधील 'नरेश कलेक्शन' या दुकानावर ही धडक कारवाई करण्यात आली.
या छाप्यात २८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यातील १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेनंतर शहरातील व्यापारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, अवैध आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतलेल्या इतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता असून, हे रॅकेट केवळ उल्हासनगरपुरते मर्यादित नसून मुंबई, ठाणे आणि देशभरात पसरले असण्याचा पोलिसांना संशय आहे.
उल्हासनगर आणि कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की, उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाला व्यवहार सुरू आहेत. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने सापळा रचून 'नरेश कलेक्शन' या दुकानावर छापा टाकला. तपासा दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात संशयास्पद कागदपत्रे, बँक व्यवहारांची माहिती आणि हवाला व्यवहारांची नोंद असलेली खाती हाती लागली. या छाप्यात जप्त केलेल्या कागदपत्रांवरून असे संकेत मिळत आहेत की, या हवाला रॅकेटचा संबंध अनेक शहरांशी असू शकतो.
पोलिसांनी या व्यवहारातील प्रमुख लोकांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या रॅकेटचा तपास करताना पोलिसांना असे आढळले आहे की, हे हवाला नेटवर्क केवळ उल्हासनगरपुरते मर्यादित नसून मुंबई, ठाणे तसेच देशभरातील मोठ्या शहरांमध्ये कार्यरत असू शकते. हवाला व्यवहारांचा उपयोग अनेकदा अवैध आर्थिक देवाणघेवाण, बोगस कंपन्यांमार्फत काळ्या पैशाचे हस्तांतरण, अमली पदार्थांची तस्करी, तसेच देशविरोधी कारवायांसाठी निधी पुरवण्यासाठी केला जातो. त्यामुळे तपास यंत्रणांनी अधिक सखोल चौकशी सुरू केली आहे. तपासात हेही समोर आले आहे की, हवाला व्यवहारासाठी मोठ्या प्रमाणात चलनातून हिशोब नसलेले रोख पैसे वापरण्यात येतात, ज्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे हा गुन्हा अधिक गंभीर स्वरूपाचा आहे.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील चौकशीत हवाला रॅकेटच्या मूळ सूत्रधारांचा शोध घेतला जात आहे. हे नेटवर्क मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याचा संशय असून, लवकरच यामधील मुख्य आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल.
- दीपक जाधव, तपास अधिकारी