आयुक्तांच्या गैरहजेरीत फेरीवाल्यांचा सुळसुळाट; भाईंदरमध्ये ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ मोहीम फक्त नावापुरती

आयुक्तांनी देखील अधिकाऱ्यांसह येऊन परिसरातल्या रस्त्यांवर पाण्याचा मारा करून रस्ते धुवून काढले व ते फोटो काढून घेतले.
आयुक्तांच्या गैरहजेरीत फेरीवाल्यांचा सुळसुळाट; भाईंदरमध्ये ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ मोहीम फक्त नावापुरती
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर शहरातील प्रमुख ठिकाणे, नाके, रस्ते, रेल्वे स्थानक आदी परिसरात प्रचंड प्रमाणात फेरीवाल्यांचे अतिक्रमण राजरोस दिसत असताना महापालिका आयुक्तांच्या ‘डीप क्लीन ड्राइव्ह’वेळी मात्र भाईंदर पश्चिम प्रभाग समिती २ मधील रस्ते चक्क फेरीवालामुक्त पाहून नागरिकांना सुखद पण आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. परंतु आयुक्त यांची पाठ वळल्यावर पुन्हा रस्ते-पदपथ फेरीवाल्यांनी बळकावले. त्यामुळे नागरिकांना रस्ते-पदपथ मोकळे करून न देण्यात पालिकेचा फेरीवाल्यांसोबतच अर्थपूर्ण सुसंवाद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रेल्वे स्थानके, महामार्ग, मुख्य रस्ते, प्रमुख नाके, ना फेरीवाला क्षेत्राचे रस्ते-पदपथ हे निदान नागरिकांच्या हिताचा विचार करून रहदारी आणि वाहतुकीसाठी मोकळे ठेवण्याची मुख्य जबाबदारी महापालिका आणि गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. मात्र यामध्ये मोठी कमाई असल्यामुळे फेरीवाले बसवणे व त्यांना संरक्षण देणे हे चराऊ कुरण बनले आहे. त्यामुळेच महापालिका आयुक्त संजय काटकरपासून उपायुक्त मारुती गायकवाड, प्रभाग समिती अधिकारी, फेरीवाला पथक आदी कोणीच शहरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे होणारी अडचण व कोंडी सोडवण्यास इच्छुक दिसत नाही. फेरीवाल्यांकडून वसुलीप्रकरणी पालिकेचे हात देखील लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या कारवाईत अडकलेले होते.

आयुक्तांनी देखील अधिकाऱ्यांसह येऊन परिसरातल्या रस्त्यांवर पाण्याचा मारा करून रस्ते धुवून काढले व ते फोटो काढून घेतले. आयुक्तांची पाठ वळताच परिसरात सर्वत्र फेरीवाल्यांनी बिनधास्त, बेधडकपणे हातगाड्या, बाकडे लावून रस्ते, पदपथावर अतिक्रमण करून नेहमीप्रमाणे धंदा चालवला आहे.

प्रतिबंधात्मक क्षेत्रात सर्वात जास्त फेरीवाल्यांचे अतिक्रमण

रेल्वे स्थानकापासून १५० मीटर, तर शैक्षणिक संकुल, रुग्णालय, धार्मिक स्थळापासून १०० मीटरपर्यंतच्या परिसरात फेरीवाले, हातगाडीवाल्यांना मनाई आहे. शिवाय महापालिकेने शहरातील अनेक मुख्य रस्ते हे ना फेरीवाला क्षेत्र जाहीर केलेले असून ठिकठिकाणी तसे फलक सुद्धा पालिकेने लावलेले आहेत. परंतु तरी देखील या प्रतिबंधात्मक क्षेत्रात उलट सर्वात जास्त फेरीवाल्यांचे अतिक्रमण आहे.

डीप क्लीन ड्राईव्हसाठी अर्थपूर्ण सुसंवाद

एरव्ही फेरीवाल्यांवर सातत्याने ठोस कारवाई पालिकेकडून होत नसताना डीप क्लीन ड्राईव्ह दिवशी भाईंदर पश्चिमेच्या प्रभाग समिती २ च्या हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्ग, मोदी पटेल मार्ग, खाऊ गल्ली आदी विविध ठिकाणी एकाही फेरीवाल्याची गाडी लागलेली नव्हती. एरव्ही चालायला जागा न ठेवणारे हे फेरीवाले असे दिसेनासे होऊन तसेच रस्ते, पदपथ मोकळे पाहून नागरिकांना सुद्धा सुखद धक्का बसला. परंतु नंतर लक्षात आले की, आयुक्त काटकर हे डीप क्लीन ड्राईव्हसाठी येणार असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आधीच अर्थपूर्ण सुसंवाद साधून परिसर मोकळा ठेवला होता.

logo
marathi.freepressjournal.in