वसई : बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा मतदारसंघात स्वतःचा स्वतंत्र उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला असून, या जागेवर नैसर्गिकरीत्या आमचाच हक्क आहे. त्यामुळे ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत आम्ही लढाविणार णि जिंकणार सुद्धा! अशी घोषणा मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विरार येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. अन्य पक्षीयांना इतर निवडणूकात आपण विनाशर्त सहाय्य करीत आलो असून, आत्ता या निवडणूकित इतर पक्षीयांनी बविआला मदत करावी. येत्या ४-५ दिवसांमध्ये आमच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचेही आ. ठाकूर यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. क्षितिज ठाकूर, बविआचे संघटक सचिव अजीव पाटील, बविआ नेते मुकेश सावे व संजीव पाटील उपस्थित होते.
पालघर लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा बनलेला आहे. या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीतर्फे भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर झाली असून, त्यांच्या प्रचारालाही सुरुवात झाली आहे. तसेच महायुतीतर्फे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे. त्यांचे नांव अद्याप घोषित झाले नसले, तरी महायुतीनेही रविवारपासून प्रचाराला प्रारंभ केला आहे. ही जागा शिवसेना (शिंदे गट) किंवा भाजपकडे गेली, तरी या दोहोंचे उमेदवार गावीत हेच असतील.
यामुळे आ. ठाकूर आपला उमेदवार देणार, अशी चर्चा काही दिवस सुरू होती. परंतु हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष निवडणूक लढवणार की नाही? याबद्दल गेल्या काही दिवसांपासून साशंकता सुद्धा व्यक्त व्यक्त करण्यात येत होती. दुसरीकडे पक्षाच्या ठिकठिकाणी प्रचारही सुरू होता. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आमच्याकडे पक्षात सात ते आठ इच्छुक उमेदवार असून, ज्येष्ठ नेते आणि सर्वांना विश्वासात घेऊन योग्य उमेदवाराची निवड लवकरच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विकासकामे हा आमचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. २००९ मध्ये आम्ही हा मतदारसंघ जिंकला होता. जिल्ह्यातील सहापैकी तीन विधान सभा, जिल्हा परिषद, पंचाईत समिती व ग्रामपंचायतीमधील बलाबल, तसेच वसई- विरार महापालिकेतील ११५ पैकी १०५ नगरसेवक आमच्याकडे होते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या आमचा या मतदारसंघावर हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक पक्षांनी माझ्याकडे पाठिंबा मागितला होता. माझे सर्व पक्षांची चांगले संबंध आहेत. सर्वांना अन्य निवडणुकांत मी मदत करीत आलो आहे. त्यामुळे इतर पक्षांनी माझ्याकडे पाठिंबा मागण्यापेक्षा सर्वांनी मिळूनच मला पाठिंबा द्यावा, असेही ते म्हणाले. बविआचे माजी खासदार बळीराम जाधव यांच्या कार्यकाळात झालेली विकास कामे, तसेच सध्या आम्हा तीनही आमदारांची सुरू असलेली विकासकामे या आधारावर आम्ही मतदारांना समोरे जाऊ. मला चिन्ह कुठलेही मिळाले, तरी या सोशल मीडियाच्या काळात घरोघरी चिन्ह सहज पोहचवले जाईल, असेही ते म्हणाले.