मोखाडा तालुक्यातील जनावरांचे आरोग्य धोक्यात; आदिवासी क्षेत्रात पशुसंपत्ती देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध

जिल्हापरिषदेने पालघर जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून जिल्ह्यातील प्रशिक्षित उमेदवारांची पेसामधून तात्पुरती नियूक्ती केल्यास जिल्ह्यातील पशुधनाला जिवदान मिळणार आहे.
मोखाडा तालुक्यातील जनावरांचे आरोग्य धोक्यात; आदिवासी क्षेत्रात पशुसंपत्ती देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध

दीपक गायकवाड/ मोखाडा : मोखाडा तालुक्यातील एकूणच आरोग्य सेवेपाठोपाठ जनावरांचे आरोग्य ही धोक्यात आले आहे. मोखाडा तालुका पशुधन विभागात २१ मंजूर पदांपैकी केवळ पाचच पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत तर तब्बल १६ पदांचा भलामोठा अनुशेष शिल्लक आहे. त्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जात सेवा द्यावी लागत आहे.

प्रस्तुत पदे तातडीने भरून मोखाडा तालुक्यातील अनुशेष भरून पशुधन सेवा पूर्ववत करण्याची मागणी वारंवार केली जात आहे. तथापि जिल्हा परिषद प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने उपचारा अभावी शेतकऱ्यांना आपली जनावरे गमवावी लागत आहेत.

तालुक्यात पशुधन विभागात पशुधन विकास अधिकारी ४ मंजूर पदांपैकी एक पद रिक्त आहे. पशुधन पर्यवेक्षक ४ पैकी ३ जागा रिक्त आहेत. तर व्रणोपचारक ३ पैकी २ रिक्त आहेत. विशेष बाब म्हणजे शिपायांची ९ पैकी ९ पदे रिक्त असून सहाय्यक पशुधन विकास अधिकारीच्या मंजूर पदांपैकी एक पद भरलेले नाही‌. त्यामूळे आहेत त्याच कर्मचाऱ्यांना पडेल ती कामे करावी लागत असल्याचे विषम चित्र आहे.

मोखाडा तालुक्यात ५९ महसुली गावे आणि २२२ पाडे आहेत. प्रत्यक्ष खेड्यापाड्यावर आणि विस्तारीत क्षेत्रात काम करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने येथील भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवून तातडीने येथील रिक्त पदे भरण्याची मागणी जि. प. सदस्या कुसूम झोले यांनी मागील वर्षी केली होती.

आदिवासींच्या दृष्टीने पशुसंवर्धन कार्यक्रम हा अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम आदिवासींना केवळ उत्पन्नाचे दुय्यम साधन द्यावे, एवढ्या पुरताच मर्यादित नसून त्यापासून त्यांना सकस आहारसुध्दा मिळण्याचे उद्दिष्ट आहे. आदिवासी क्षेत्रात पशुसंपत्ती ही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पशुधन व म्हशी यांचे प्रमाण आदिवासी क्षेत्रात अनुक्रमे सुमारे २७ टक्के व १९ टक्के इतके आहे. तसेच शेळा मेंढ्यांचेही प्रमाण बरेच मोठे असून त्यांचे प्रमाण अनुक्रमे सुमारे ११ व २२ टक्के इतके आहे. त्याचप्रमाणे सुमारे २५ टक्के कुक्कुटसंख्या सुध्दा आदिवासी क्षेत्रामध्ये आहे.

तथापि जिल्हापरिषदेने पालघर जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून जिल्ह्यातील प्रशिक्षित उमेदवारांची पेसामधून तात्पुरती नियूक्ती केल्यास जिल्ह्यातील पशुधनाला जिवदान मिळणार आहे. तथापि, पशु विकासाची वाढ खुंटल्यामुळे दूध, अंडी, मांस यांचे उत्पादन कमी आहे.पशुसंवर्धन विभागाचे कार्यक्रम सदर उत्पन्नात वाढ होण्याच्या हेतूने आखण्यात येत असून त्यामध्ये पशु संगोपन, पशु आरोग्य व इतर मुबलक सोयी निर्माण करणे इत्यादी बाबींचा समावेश करत असल्याचा उहापोह पशुसंवर्धन विभाग एकीकडे करीत आहे.

तालुक्यातील भल्यामोठ्या रिक्त पदांबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभागाशी संपर्क विचारणा केली पशुधन पर्यवेक्षकांची जाहिरात महाराष्ट्रभर काढण्यात आली आहे. परंतु १३ जिल्ह्यांत पेसा भरती करण्याची मागणी केली जात असल्याने पालघर जिल्ह्यातही भरतीबाबत साशंकता आहे.

- डॉ.प्रकाश हसनआळकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,पालघर

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in