लाँग मार्चसाठी निघालेल्या आशा सेविकांची प्रकृती खालावली; उष्माघातामुळे २७ महिला रुग्णालयात दाखल

तूर्तास रुग्णवाहिकांमधून चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेतील सर्व महिलांना भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लाँग मार्चसाठी निघालेल्या आशा सेविकांची प्रकृती खालावली; उष्माघातामुळे २७ महिला रुग्णालयात दाखल
Published on

भिवंडी : गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शेकडो महिलांनी शासनाच्या निषेधार्थ ७ ते ९ फेब्रुवारी असा लॉंग मार्च शहापुरातून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील, सरचिटणीस भगवान दवणे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला. दरम्यान सदर लॉंग मार्च गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी दुपारी सोनाळे गावच्या हद्दीत पोहचला असता उष्माघाताने २७ महिलांची प्रकृती अचानकपणे खालावली. दरम्यान तूर्तास रुग्णवाहिकांमधून चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेतील सर्व महिलांना भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान ७ फेब्रुवारी रोजी सदर पदयात्रेचे शहापूर येथील विश्राम गृहातून बुधवारी सकाळी ९:३० वाजता सुरू होऊन दुपारी वाशिंद येथे भोजन करून विश्रामानंतर रात्री पडघ्यात वास्तव्य केले. त्यानंतर पुन्हा गुरुवारी पदयात्रा सुरू झाली. त्यानंतर पदयात्रा भिवंडीतील सोनाळे येथे रवाना झाली.

परंतु दुपारी १ ते दीड वाजताच्या उष्माघाताच्या कहराने लता बाळकृष्ण दामसे,मीना ठाकरे, साधना हरड, प्रतीक्षा ठाकरे, आनंदी सोंगा, शारदा विषे, प्रतीक्षा डोहळे, सीमा भला, भक्ती राऊत, विशाखा पाटील, अंकिता किसले, संगीता लुटे, वंदना कबाडे, प्रमिला जाधव, वंदना बोरकर, आम्रपाली पंडित, प्रतिभा सूर्यवंशी, संगीता काशीकर, वंदना इंगले, पूजा कांबळे, सुनंदा जाधव, प्रियंका क्षीरसागर, माया मोरे, मनीषा पवार, कांचन म्हस्कर, इरोपा सोनवणे, ललिता रोकडे या २७ महिलांना अचानकपणे चक्कर येवून अस्वस्थ वाटू लागले.

यातील ४ ते ५ महिलांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर तात्काळ सर्व महिलांना रुग्णवाहिकांमधून इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात येवून उपचारानंतर सर्व महिला सुस्थितीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी नंतरच हा लॉंग मार्च शांत होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in