दहीहंडीच्या मुहूर्तावर पावसाचे दमदार आगमन वातावरणात गारवा ; उकाड्यापासून सुटका
ठाणे : ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस दहीहंडीच्या मुहूर्तावर पुन्हा परतला आहे. मुंबई, ठाण्यासह राज्याच्या विविध भागात पावसाने जोरदार सलामी दिली. त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
अनेक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने गोपाळकाल्याचा मुहूर्त साधत जोरदार पुनरागमन केले. दहीहंडीच्या दिवशी पहाटेपासून पावसाने मुंबई, ठाणे, नवी मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली आणि दिवसभर बरसत गोविंदा पथकांना पावसात भिजवून टाकले.
पहाटे झालेल्या पावसामुळे ठाण्यातील खारकरआळी, पेढ्या मारुती गल्लीत पाणी साचले होते. ठाणे शहराने पूर्वीच गेल्यावर्षीच्या पावसाचा आजपर्यंतचा रेकॉर्ड मोडला असून गेल्यावर्षी ७ सप्टेंबर २०२२ पर्यंत २२०१ मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली होती, तर ७ सप्टेंबर २०२३ पर्यंत एकूण पाऊस २८५७.८७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जव्हार तालुक्यात पावसाची हजेरी
जव्हार तालुक्यातील भात, नागली, वरई व उडीद ही प्रमुख पिके घेतली जातात. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने अचानक दडी मारल्यामुळे भात, नागली, वरई ही पिके करपून नष्ट होण्याची भीती निर्माण झाली होती. बुधवारपासून या भागात पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरीवर्ग काही प्रमाणात सुखावला आहे. पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
ग्रामीण भागात मासेमारीला सुगीचे दिवस
ग्रामीण भागात मासेमारी करणाऱ्यांसाठी जणू सुगीचे दिवस आल्याचे पहावयास मिळत आहे. पावसाळा सुरू झाल्याबरोबर सुरुवातीला पावसाचे पाणी ठिकठिकाणी साठल्यामुळे नदीप्रवाहातून आलेले मासे मारण्यासाठीची एकच लगबग ग्रामीण भागात दिसून येत होती.
ग्राफिक
कोकणात ८७.६ मि.मी., तर ठाणे जिल्ह्यात ७८.८ मि.मी. पाऊस झाला. मुरबाडला ७७.३ मि.मी., उल्हासनगरात ५९.९ मि.मी., ठाणे ७६.२ मि.मी., कल्याण ७४.१ मि.मी., भिवंडी ७९.७ मि.मी., शहापूर ७६ मि.मी., अंबरनाथ ६९.९ मि.मी. नोंद झाली आहे.