ठाण्यातील झाडांना आगीची झळ

झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन वृक्षांचे जतन करण्याचा आवाहन केले जात असले तरी, ठाण्यात या आवाहनाला हरताळ फासण्यात येत आहे.
ठाण्यातील झाडांना आगीची झळ

ठाणे : झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देऊन वृक्षांचे जतन करण्याचा आवाहन केले जात असले तरी, ठाण्यात या आवाहनाला हरताळ फासण्यात येत आहे. ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठ रस्त्याकडे लावलेली झाड जाळण्याचे दुष्कर्म करण्यात आले आहे. गावताला आग लावताना या आगीची झळ झाडांना बसली आहे. आगीच्या झळीने झाडांचे मोठे नुकसान होत असून, यामुळे पर्यावरणप्रेमी नाराज झाले आहेत.

ठाणे पूर्व मीठबंदर रोड स्वामी समर्थ मठ रस्त्याच्या दुतर्फा पर्यावरण प्रेमींनी झाड लावली आहेत. एखाद्या लहान मुलाप्रमाणे या झाडांची जोपासना केली जात आहे. गेल्या काही वर्षात परिसराचा चेहरा मोहरा बदललेला बघायला मिळतो. वृक्षारोपण केलेल्या झाडांना नियमित पाणी घालून झाड वाढवली आहेत. त्यामुळे सकाळी आणि संध्यकाळच्या वेळी फिरण्याचा वेगळा आनंद ठाणेकर घेताना दिसतात. मात्र गेल्या आठवड्यापासून या ठिकाणी आगी लावण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती वृक्षमित्र मनोहर चव्हाण यांनी दिली.

या परिसरात नारळ, आवळा, बदाम, पिंपळ, वड, कदंब, गुलमोहर, अशी विविध झाड बघायला मिळतात. लहान मोठी मिळून सुमारे १०० हून अधिक झाड दिसतात. मात्र पावसाळ्यात वाढलेले गवत पेटविण्याचा घटना वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे या आगीची झळ झाडांना बसते आहे. वसंत ऋतू सुरू झाल्यामुळे झाडांची पान गळतीचा हंगाम सुरू आहे. अशातच या आगीत झाडांना होरपळत आहेत. नुकताच काही झाडांनी जोम धरला आहे. त्यामुळे आगी वाढल्या तर नक्कीच याचा त्रास झाडांना होणार असल्याचे वृक्षमित्र स्वप्नील कोळी म्हणाले.

काही ठिकाणी जाणीवपूर्वक असे प्रकार घडवून आणले जात आहेत. त्यामुळे आगी लागण्याच्या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आगीची घटना घडल्यानंतर किंवा बातमी आल्यानंतर बऱ्याच वेळा वृक्षसंवर्धनाबाबतची चर्चा फक्त सोशल मीडियापुरतीच मर्यादित दिसून येते. बऱ्याचवेळा टेलिफोन लाईनची खुदाई, पाईपलाईन खुदाई, रस्ता दुरुस्ती अशी कामे करताना झाडांच्या सुरक्षेबाबत काळजी केली जात नाही. अशी खदखद स्थानिक रहिवाशांनी बोलून दाखवली आहे.

"स्वामी समर्थ रस्त्याच्या दोन्ही बाजुला विविध झाडांची मांदियाळी बघायला मिळते. मात्र अप प्रवृत्तीमुळे झाडांना धोका निर्माण झाला आहे. थंडीच्या दिवसात सुकलेले गवत अज्ञात व्यक्तींकडून जाळलं जात आणि या आगीत अनेक झाड भक्षस्थानी होतात. आगी लावणाऱ्या अज्ञातांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. या खेरीज सीसीटिव्ही लावणे गरजेचे आहे." - मनोहर चव्हाण, वृक्षप्रेमी

"फिरायला येणारे अनेक ठाणेकर आपल्या सोबत पाण्याच्या बाटल्या आणून ही झाडं वाढवत आहेत. मात्र आग लावून निर्दयी वृत्तीने झाड मारण्याचा प्रकार होतो आहे. आगीचे प्रकार रोखण्यासाठी पावसाळ्यात गवत वाढणार नाही. यासाठी महापालिकेने प्रयत्न करणे आवश्यक आहे." - स्वप्नील कोळी, वृक्षप्रेमी

logo
marathi.freepressjournal.in