ठाण्यात मध्यरात्री पासून पावसाची जोरदार हजेरी

मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास धो धो पावसाने सुरुवात केली
ठाण्यात मध्यरात्री पासून पावसाची जोरदार हजेरी

ठाणे जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले असून शहरात देखील पावसाने मध्यरात्री पासून जोरदार हजेरी लावली होती. शहरात सुमारे १३५.४३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे सोमवारी आणि मंगळवारी जिल्यात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला असल्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे ३ च्या सुमारास धो धो पावसाने सुरुवात केली. कळवा खारेगांव येथे असलेल्या चाळीजवळ पाणी साचले होते. या तक्रारीची दखल घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचून त्यांनी वॉटर पंपच्या सहाय्याने पाणी बाहेर काढले.

घोडबंदर येथील खड्यामुळे दुचाकीस्वराचा मृत्यू

काजूपाडा, घोडबंदर रोड येथे ठाणेकडून मुंबईकडे जाणाऱ्या रोडवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. सदरच्या खड्ड्यांमुळे आज सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास दुचाकीहून मुंबईकडे जाणाऱ्या एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ठाण्याकडून मुंबईकडे जात असताना खड्ड्यामध्ये दुचाकी गेल्याने तोल जाऊन सदरचा दुचाकीस्वार दुचाकीवरून रोडवरती पडला व त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बसच्या मागील चाकाखाली आल्याने सदर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सदर घटनास्थळी वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in