मुंब्य्रात हायहोल्टेज ड्रामा तुमची मस्ती फाडतो : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा वादग्रस्त शाखेपासून काही अंतरावर अडवला आहे
मुंब्य्रात हायहोल्टेज ड्रामा तुमची मस्ती फाडतो : उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

ठाणे : शिवसेनेच्या मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवण्यात आल्यामुळे येथे मोठा वाद पेटला आहे. ज्यांना सत्तेचा माज आला आहे, त्यांनी बुलडोजर लावून शिवसेनेची शाखा तोडली. बुलडोजर काय असतो ते दाखवण्यासाठी मी आज आलो आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता शिंदे गटाला लगावला. आमची पोस्टर्स फाडली. निवडणुका येऊ द्या तुमची मस्ती फाडतो, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला. ठाकरे यांनी आपल्या भाषणात पोलिसांवर देखील निशाणा साधला. पोलिसांनी केवळ शाखा चोरांचे आणि मालकांचे रक्षण केले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

शिंदे गटाकडून जमीनदोस्त करण्यात आलेल्या मुंब्र्यातील शाखेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करण्यासाठी शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंब्र्यात आले होते. मात्र, सुरक्षेच्या कारणांमुळे ठाकरे यांना शाखेच्या ठिकाणी जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते समोरासमोर आले होते. शिंदे गटावर टीका करताना ठाकरे म्हणाले, प्रशासन हतबल झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आज येथे काही घडलं असतं, तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. सत्तेची गादी भोगणाऱ्यांनी आधीच महाराष्ट्राची अब्रू घालवली आहे.” दिल्लीच्या कृपेने सत्तेत बसलेले हे कटपुतळे आहेत. खोके सरकारनं आमची शाखा पाडून एक खोका अडकवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केलं आहे. तो खोका लवकरात लवकर उचलावा. अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देऊ. तुमच्यात हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला सारून समोर या,” असं आव्हान उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिलं.

खूप वर्षांनी मी मुंब्र्यात आलो आहे. आपली कधी मैत्री झाली नाही. आपले काही गैरसमज होते. मात्र अडीच वर्षं आपण कारभार कसा केला आहे ते पहिले आहे. या चोरांच्या हातात आपल्या मुलांचे भविष्य देणे आपल्याला मंजूर आहे का? असा प्रश्न देखील मुंब्र्यातील नागरिकांना ठाकरे यांनी विचारला. यावेळी त्यांनी नाव न घेता शिंदे गटाच्या खासदारांवरही टीका केली. महापालिकेतील गद्दारांचे आणि जो कोणी खासदार असेल त्यांचे डिपॉजिट जप्त करा, असे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

ज्यांना आपण विधानसभेत पाठवले ते आमच्या सोबत आहेत. असे सांगत त्यांनी आव्हाड यांचेही कौतुक केले. मी लढायला मैदानात उतरलो आहे. किती लोक माझ्यासोबत येणार आहे त्या बाजूला भाड्याने आणलेले टट्टू आहेत. पोलिसांनाही ताकीद देत आहे. चोरांचे रक्षण करू नका तसेच महापालिका आयुक्तांना सांगतो, माझे शिवैसैनिक ज्या जागेवर बसतील त्याच जागेवर नवीन शाखा बांधू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दोन्ही गटाकडून घोषणाबाजी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीम अलर्ट झाली. त्यानंतर शनिवारी सकाळपासून शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, नरेश म्हस्के, आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह मुंब्र्यात पोहचले होते, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, आमदार अनिल परब, अजय चौधरी, मिलिंद नार्वेकर अशी उद्धव ठाकरे यांची सेना मैदानात उतरली. दोन्ही बाजूकडील जवळपास २० ते २५ हजार कार्यकर्ते आणि दीड हजारांपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त घटनास्थळी उपस्थित होते. दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने दोन्ही बाजूनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

उद्धव ठाकरेंचा ताफा पोलिसांनी अडवला...

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा वादग्रस्त शाखेपासून काही अंतरावर अडवला आहे. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आणि मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आमनेसामने आले आहेत. त्यामुळे मुंब्र्यात घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला.

logo
marathi.freepressjournal.in