
उल्हासनगर : जम्मू-काश्मीर मधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतला असताना, भारतात कायम स्वरूपी स्थायिक होण्याच्या आशेने आलेल्या हिंदू सिंधी बांधवांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील नागपूर, उल्हासनगर, जळगाव, भुसावळ आणि पिंपरी परिसरात स्थायिक झालेल्या सिंधी कुटुंबांना वाचवण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हस्तक्षेप करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती उल्हासनगर भाजपचे महासचिव दीपक छतलानी यांनी दिली आहे. भारत हा हिंदूंचा एकमेव आधार आहे, आणि यासाठीच सिंधी बांधवांना दीर्घकालीन संरक्षण मिळायला हवे, असे मत छतलानी यांनी व्यक्त केले आहे.
हिंदू सिंधी समाजाच्या वतीने उल्हासनगर भाजपचे महासचिव दीपक छतलानी यांनी महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे प्रमुख वीरेंद्र (विकी) कुकरेजा यांच्या सहकार्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष विनंती करण्यात आली आहे. या संदर्भात परराष्ट्र मंत्रालय व गृह मंत्रालयाकडे हस्तक्षेप करून या सिंधी कुटुंबांना ‘दीर्घकालीन व्हिसा’ (LTV) देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
“आमच्या हिंदू सिंधी बांधवांनी आपले सर्व काही विकून भारतात आश्रय घेतला आहे. त्यांनी पाकिस्तानमधील आपली संपत्ती, जीवनमान सोडले आणि भारताला आपले नवे घर मानले आहे. आता त्यांच्या नशिबाशी खेळू नये. भारत हा हिंदूंचा एकमेव आधार आहे, आणि यासाठीच या बांधवांना दीर्घकालीन संरक्षण मिळायला हवे,” असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
उल्हासनगर भाजपचे महासचिव दीपक छतलानी पुढे म्हणाले, “मी या विषयावर वीरेंद्र कुकरेजा यांच्या संपर्कात असून, सिंधी समाजाच्या या न्याय्य मागणीसाठी प्रयत्नशील आहे. हिंदू सिंधी बांधवांच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पावले उचलावीत आणि त्यांना भारतात अधिकृतरीत्या स्थायिक होण्याचा मार्ग मोकळा करावा अशी आमची अपेक्षा आहे.”
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवेदनशील विषयाकडे सहानुभूतीने पाहून परराष्ट्र व गृह मंत्रालयाशी तातडीने संपर्क साधावा आणि दीर्घकालीन व्हिसा (LTV) देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी हिंदू सिंधी समाजाकडून करण्यात येत आहे.
सिंधी समाजाची सद्यस्थिती :
- पहलगाम हल्ल्यानंतर सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
- हिंदू सिंधी कुटुंबांनी पाकिस्तानमधील सर्व मालमत्ता विकून भारतात स्थलांतर केले.
- महाराष्ट्रातील नागपूर, उल्हासनगर, जळगाव, भुसावळ व पिंपरीमध्ये स्थायिक झालेली कुटुंबे.
- तात्पुरत्या व्हिसावर असलेल्या कुटुंबांना दीर्घकालीन व्हिसा (LTV) देण्याची मागणी.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे परराष्ट्र आणि गृह मंत्रालयाकडे शिफारस करण्याची विनंती.
"भारत हा आमच्या हिंदू सिंधी बांधवांसाठी आशेचा आणि अस्तित्वाचा एकमेव दीप आहे. पाकिस्तानमधील सर्व काही विकून भारतात आलेल्या कुटुंबांना आधार देणे आपले नैतिक कर्तव्य आहे. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करतो, की त्यांनी तत्काळ लक्ष घालून या हिंदू सिंधी बंधूंना दीर्घकालीन व्हिसा (LTV) मिळवून द्यावा. त्यांच्या आयुष्याच्या सुरक्षेसाठी आणि भविष्याच्या निर्धास्ततेसाठी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा. भारताने नेहमीच पीडितांचा हात धरला आहे, आणि आता आमच्या सिंधी बांधवांसाठीही त्याच उदारतेने उभे राहावे हीच अपेक्षा आहे."
- दीपक छतलानी, ( उल्हासनगर भाजपा महासचिव )