यंदा रंगपंचमीत 'जादू'च्या कलरचे आकर्षण; बच्चेकंपनीला भुरळ, रंग लावल्यानंतर काही क्षणात होतो गायब

‘जादू’ कलरने रंगपंचमीच्या आधीच सर्वांना भुरळ पाडली आहे. ‘जादू’ कलर घेण्यासाठी बच्चेकंपनीची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.
यंदा रंगपंचमीत 'जादू'च्या कलरचे आकर्षण; बच्चेकंपनीला भुरळ, रंग लावल्यानंतर काही क्षणात होतो गायब
Published on

ठाणे : होळी व रंगाचा उत्सव अर्थात रंगपंचमी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाजारात विविधरंगी वातावरण बघायला मिळत आहे. यंदा होळीसाठी बाजारात विविध प्रकारचे रंग विक्रीसाठी उपलब्ध असले तरी विशेष आकर्षण ‘जादू’ कलरचे आहे. ‘जादू’ कलरने रंगपंचमीच्या आधीच सर्वांना भुरळ पाडली आहे. ‘जादू’ कलर घेण्यासाठी बच्चेकंपनीची बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.

ठाण्यात जांभळी नाका, नौपाडा मार्केट भागातील दुकानांत रंग, पिचकाऱ्या व खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. रविवारी होणाऱ्या होळीसाठीही गल्लीबोळांमध्ये तयारी सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठेत रंगोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. विविध प्रकारातील रंग, पिचकाऱ्यांनी दुकाने सजली आहेत. छोटा भीम, स्पायडरमॅन या लहानग्यांचा आवडत्या हिरोंसह मोठ्या बंदुकीच्या आकारातील पिचकाऱ्यादेखील मुलांच्या पसंतीस उतरत आहेत. रंगांमध्ये केमिकलयुक्त व पर्यावरणपूरक असे दोन प्रकार आहेत. केमिकलयुक्त रंग हे त्वचेसाठी घातक असल्याने गेल्या काही वर्षांपासून नागरिकांमध्ये पर्यावरणपूरक रंग वापरण्याबाबत विविध सामाजिक संस्थाकडून जागृती केली जात आहे. या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत असून, पर्यावरणपूरक रंगांची मागणी वाढली आहे.

‘जादू’ कलरचे वैशिष्ट्य

‘जादू’ कलरचे वैशिष्ट्य म्हणजे हा कलर अंगाला अथवा कपड्याला लावल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच गायब होत असल्याने सर्वांच्या पसंतीला उतरत आहे. अवघ्या पन्नास रुपयांमध्ये ‘जादू’चा कलर बाजारात उपलब्ध आहे. अनेक जणांना रंगपंचमी खेळताना ओला रंग खेळण्यास आवडत नाही, ज्यांचा भर कोरड्या रंगपंचमी खेळण्याकडे असतो, त्यांनी देखील ‘जादू’च्या कलरला अधिक पसंती दिली आहे.

logo
marathi.freepressjournal.in