'आपला दवाखाना' वेळेआधीच बंद! दवाखान्यातील कर्मचारी आठच्या आत घरात

'आपला दवाखाना' वेळेआधीच बंद! दवाखान्यातील कर्मचारी आठच्या आत घरात

मोखाड्यात संध्याकाळच्या वेळी एकही खासगी दवाखाना सुरू राहत नाही.
Published on

मोखाडा : नागरिकांना आरोग्याच्या मुलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे 'आपला दवाखाना' योजना सुरू केली. या योजनेतून बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण आदी उपयोगी सोयी सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा मोखाडा बस स्थानकांच्या बाजूचा आपला दवाखाना (नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र) गेल्या काही दिवसांपासून वेळेआधीच बंद होत आहे.

मोखाडा नगरपंचायतमधील नागरिकांना आजारपणात वेळीच उपचार मिळावेत यासाठी बस स्थानकांच्या बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना सुरू केला आहे. हा दवाखाना दुपारी दोन वाजता चालू होऊन रात्री दहा वाजता बंद करावा असा सार्वजनिक आरोग्य विभागाचा नियम असताना ही मोखाड्यातील आपला दवाखाना मात्र दीड-दोन तास अगोदर बंद होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. यामुळे रात्री आठ वाजेनंतर आपला दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या नगरपंचायतमधील नागरिकांना वेळेवर ग्रामीण रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे.

मुळात मोखाड्यात संध्याकाळच्या वेळी एकही खासगी दवाखाना सुरू राहत नाही. त्यातही सरकारी आरोग्य यंत्रणा पाहिजे तेवढी सक्षम नाही किरकोळ आजारपणातील उपचारासाठी देखील रुग्णांना रात्री अपरात्री नाशिक शहरांची वाट धरावी लागते. इमरजन्सी उपचाराच्या दृष्टीने नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र म्हणजेच आपला दवाखाना फायदेशीर ठरत होता, परंतु तोही दवाखाना गेल्या काही दिवसांपासून वेळे आधीच बंद करून कर्मचारी घरी जात असल्याने नागरिकांना मात्र उपचाराअभावी घरी परतावे लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in