

ठाणे : कधीकाळी घरांच्या खिडक्यांत, अंगणात आणि झाडांच्या फांद्यांवर सतत किलबिल करणाऱ्या चिमण्या शहरातून जवळपास नामशेष झाल्याचे चित्र गेल्या काही वर्षांत दिसत होते. मात्र, अलीकडच्या काळात ठाणे आणि मुंबई परिसरात काही ठिकाणी चिमण्या पुन्हा दिसू लागल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये आशेची नवी किरण निर्माण झाली आहे. तरीही ही वाढ अत्यंत मर्यादित असून परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली नाही, हे तितकेच वास्तव आहे.
गेल्या दोन दशकांत वाढलेल्या नागरिकरणामुळे चिमण्यांचे नैसर्गिक अधिवास मोठ्या प्रमाणात नष्ट झाले. उंच इमारती, सिमेंट-काँक्रीटचे जाळे, झाडांची घटती संख्या आणि घरटी बांधण्यासाठी जागेच्या अभावामुळे चिमण्या शहरातून हळूहळू गायब होऊ लागल्या. त्यातच शेती आणि शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांमुळे त्यांचे अन्न असलेले कीटक कमी झाले. वाढते ध्वनी आणि वायू प्रदूषणही त्यांच्या अस्तित्वासाठी घातक ठरले.
मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थितीत थोडाफार सकारात्मक बदल दिसू लागला आहे. कोविड लॉकडाऊनच्या काळात प्रदूषणात झालेली घट आणि तुलनेने शांत वातावरणामुळे पक्ष्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर, काही स्वयंसेवी संस्था आणि जागरूक नागरिकांनी पुढाकार घेत आपल्या घरांच्या गॅलरीत धान्य ठेवणे, पाण्याची भांडी ठेवणे आणि कृत्रिम घरटी (नेस्ट बॉक्स) बसवणे अशा उपक्रमांना सुरुवात केली. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील काही सोसायट्यांमध्ये या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचा परिणाम म्हणून चिमण्यांची उपस्थिती पुन्हा जाणवू लागली आहे.
तज्ज्ञांच्या मते, चिमण्या या केवळ एक सामान्य पक्षी नसून त्या पर्यावरणाच्या आरोग्याचे महत्त्वाचे संकेतक आहेत. ज्या परिसरात चिमण्या आढळतात, तेथे अन्न, पाणी आणि सुरक्षित अधिवास उपलब्ध असल्याचे मानले जाते. त्यामुळे चिमण्यांचे पुनरागमन ही सकारात्मक बाब असली तरी त्यांचे अस्तित्व अजूनही धोक्यातच आहे.
सध्या शहरांमध्ये सुरू असलेले वेगवान काँक्रीटीकरण, झाडांची सतत होणारी तोड, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि प्रदूषणाची समस्या या सर्व घटकांमुळे चिमण्यांसमोरचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे केवळ काही भागात दिसणारी वाढ ही स्थिर आणि सुरक्षित पुनरागमन समजणे धोकादायक ठरू शकते.आज जर आपण जागरूक झालो नाही, तर उद्या आपल्या पुढील पिढीला चिमण्या फक्त चित्रांमध्ये आणि पुस्तकांमध्येच पाहायला मिळतील, हीच खरी भीती आहे.
चिमण्यांचे संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आहे. घराच्या गॅलरीत थोडे धान्य ठेवणे, पाण्याची सोय करणे, झाडे लावणे आणि कृत्रिम घरटी बसवणे यांसारख्या छोट्या कृतींमुळे मोठा बदल घडू शकतो.
डॉ. प्रशांत सिनकर (पर्यावरण अभ्यासक ठाणे)