
वसई : अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कार्यकाळात ग्रामसेवक संतोष कोळी आणि विद्यमान सरपंच पूजा राजेश म्हात्रे यांच्या कार्यकाळात झालेला घरपट्टी घोटाळा उजेडात आला आहे. फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२३ या प्रशासकीय काळात आणि सरपंच म्हात्रे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंतच्या काळात नागरिकांकडून वसूल करण्यात आलेले घरपट्टीचे सुमारे साडेपाच लाख रुपये ग्रामपंचायातीच्या बँक खात्यात भरणा करण्यात आले नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी सरपंच, तथा विद्यमान सदस्य चंद्रकांत रामचंद्र मेहेर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सविस्तर निवेदन देऊन केली आहे.
फेब्रुवारी २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत नागरिकांकडून रुपये १२ लाख १३ हजार घरपट्टी वसूल करण्यात आली होती. मात्र बँकेत प्रत्यक्ष भरणा केवळ रुपये ६ लाख ८२ हजारांचा करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. उरलेल्या ५ लाख ३० हजारांची अपरातफर करण्यात आल्याचा आरोप माजी सरपंच चंद्रकांत मेहेर यांनी केला आहे.
याबाबत मेहेर यांनी माहिती अधिकाराखाली माहिती मागितली होती, यामध्ये धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून दैनंदिन रजिस्टर व बँक पासबुकवरून नागरिकांकडून घेतलेल्या पैशांमध्ये रुपये ५,३०,१०७/- इतक्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वसईच्या गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठवून, संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल त्वरित सादर करण्याचा आदेश दिला आहे. मात्र याप्रकरणी दप्तर दिरंगाई सुरू आहे. सरपंच पूजा म्हात्रे, उपसरपंच अजय वैती आणि ग्रामसेवक संतोष कोळी यांना दाखल करून सेवेतून बडतर्फ करावे.
- चंद्रकांत मेहेर, माजी सरपंच,
हातातील सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत मेहेर सैरभैर झाले आहेत. नैराश्यातून त्यांनी खोटे आरोप केले आहेत. आमच्या दोघांच्याही कार्यकाळात कोणताही भ्रष्टाचार आम्ही केलेला नाही. एक प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणीला असून, त्यातूनही दूध का दूध पानी का पानी शुद्ध होणार आहे.
- विजय मालू मेहेर, माजी सरपंच, अर्नाळा किल्ला ग्रामपंचायत