ठाणे : वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो ४च्या कामाला वेग आला असून, या कामामुळे घोडबंदर पट्ट्यात मात्र मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे या पट्ट्यातून रात्री प्रवास करणारे वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत.
दुसरीकडे याच कामाचा एक भाग म्हणून वाघबीळ भागात गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात येणार असून, यामुळे वाहतूक विभागाने या पट्ट्यात मोठे बदल केले असून, २७, ३१ मार्च आणि १ एप्रिल या तीन दिवसांमध्ये या भागात वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
ठाणे शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेचा महत्त्वाचा टप्पा सध्या घोडबंदर भागात सुरू आहे. या कामाचा भाग म्हणून वाघबीळ भागात मेट्रोच्या खांबावर गर्डर उभारले जाणार आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी या मार्गावर वाहतूक बदल लागू केले आहेत. यामध्ये ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाघबीळ उड्डाणपुलाजवळ प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहने छेद रस्त्यावरून विरुद्ध दिशेने वाहतूक करत उड्डाणपुलावरून जातील. तसेच घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारी वाहने उड्डाणपुलाखालील मार्गावरून वाहतूक करतील. २६ ते २७ मार्च आणि ३१ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत रात्री ११.५५ पहाटे ४ यावेळेत हे वाहतूक बदल लागू असतील.
काम २०२५ पर्यंत पूर्ण होणार
कोविडमुळे मेट्रोच्या कामामध्ये बराच काम अडथळा निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर या कामाला काहीसा वेग आला आहे. नुकताच विद्यमान खासदार राजन विचारे यांनी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला असून, आता हे काम २०२५ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे किमान दीड ते दोन वर्ष आणखी ठाणेकरांना या वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे.