ठाणे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेला वेग; १४-१५ वर्षांच्या मुलींना मोफत लस; पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हयकल कॅन्सर) हा अत्यंत धोकादायक आजार मानला जातो. या कर्करोगाचे प्रमुख कारण एचपीव्ही (Human Papilloma Virus-HPV) हा विषाणू आहे. मात्र योग्य वयात प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
ठाणे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेला वेग; १४-१५ वर्षांच्या मुलींना मोफत लस; पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
ठाणे जिल्ह्यात HPV लसीकरण मोहिमेला वेग; १४-१५ वर्षांच्या मुलींना मोफत लस; पालकांनी पुढाकार घेण्याचे आवाहनप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : महिलांमध्ये आढळणाऱ्या गंभीर आजारांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हयकल कॅन्सर) हा अत्यंत धोकादायक आजार मानला जातो. या कर्करोगाचे प्रमुख कारण एचपीव्ही (Human Papilloma Virus-HPV) हा विषाणू आहे. मात्र योग्य वयात प्रतिबंधात्मक लसीकरण केल्यास या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती मोहिमेला वेग देण्यात आला आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून १४ वर्षे पूर्ण (१५ वर्षे पूर्ण न झालेले) वयोगटातील मुलींना ही लस आता सरकारी रुग्णालयांत मोफत दिली जात आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर पडघे यांनी जिल्ह्यातील पालकांना आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन केले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत एचपीव्ही लस बाजारात अत्यंत महागडी असल्यामुळे अनेक कुटुंबांना ती परवडत नव्हती. त्यामुळे अनेक मुली या महत्त्वाच्या संरक्षणापासून वंचित राहत होत्या. मात्र राज्य सरकारच्या पुढाकारामुळे आता ही लस सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत विनामूल्य उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील मुलींसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.

भविष्यात कर्करोगाचा धोका टाळता येतो

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, एचपीव्ही विषाणू हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी प्रमुख कारणीभूत घटक आहे. योग्य वयात लसीकरण केल्यास भविष्यात या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून जगातील १६० हून अधिक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिली जाते. आतापर्यंत या लसीचे गंभीर दुष्परिणाम आढळलेले नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.

गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी एचपीव्ही लस अत्यंत प्रभावी आहे. मात्र सोशल मीडियावर या लसीबाबत काही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता सरकारी आरोग्य केंद्र किंवा डॉक्टरांकडूनच योग्य माहिती घ्यावी. ठाणे जिल्ह्यातील पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे.

डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक

माजी महापौरांच्या प्रभागातून लसीकरणाचा शुभारंभ

कर्करोगासारख्या गंभीर आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठाणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पुढाकाराने त्यांच्या प्रभागात १२ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही (Human Papillomavirus) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (सर्व्हयकल कॅन्सर) टाळण्यासाठी ही लस अत्यंत प्रभावी मानली जाते.

खासगी रुग्णालयांमध्ये या लसीची किंमत सुमारे १० हजार रुपयांपर्यंत असल्याने अनेक कुटुंबांना ती परवडत नाही. मात्र सर्वसामान्य कुटुंबातील मुलींनाही हे संरक्षण मिळावे, या उद्देशाने ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमार्फत ही लस मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सध्या महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक लस घेणे अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर काही मुलींना ही लस देण्यात आली असून आता आरोग्य विभागामार्फत घरोघरी जनजागृती करून तसेच आरोग्य केंद्रांवरही ही मोहीम राबवली जाणार आहे.

मीनाक्षी शिंदे, माजी महापौर

logo
marathi.freepressjournal.in