दाम्पत्याची आत्महत्या, परिसरात हळहळ

भाईंदर पूर्वेच्या नवघर भागात पती व पत्नी यांनी मिळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दाम्पत्याची आत्महत्या, परिसरात हळहळ
Published on

भाईंंदर : भाईंदर पूर्वेच्या नवघर भागात पती व पत्नी यांनी मिळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भाईंदर पूर्वेच्या नवघर गाव येथील गावदेवी चाळीत जांगीड कुटुंब राहते. १० एप्रिल रोजी नीतू पंकज जांगिड (३०) व त्यांचे पती पंकज पुरषोत्तम जांगीड (३६) हे दोघे घरातील स्वयंपाकघरातल्या छताच्या पंख्यास ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. पंकज यांचा लहान भाऊ संजूकुमार यांच्या माहितीवरून नवघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पती - पत्नीच्या आत्महत्येच्या घटनेने खळबळ उडाली असून आत्महत्येचे कारण मात्र अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक किशोरकुमार नेवसे हे तपास करत आहेत.

जांगीड दाम्पत्याचे सुमारे ९ ते १० वर्षा पूर्वी लग्न झाले होते. त्यांना ८ वर्षांची मुलगी आणि २ वर्षांचा मुलगा आहे. पंकज हे फर्निचर बनवून देण्याचे काम करत होते. भाऊ आदींशी ते फारसे काही अडचणीबद्दल सांगत नसले तरी त्यांच्यावर काही कर्ज झाले होते. पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता पती - पत्नीचे भांडण झाल्याचा आवाज ऐकला नसल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. नीतू व पंकज यांचे मृतदेह १० एप्रिलच्या रात्री शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यविधीसाठी त्यांच्या राजस्थान येथील मूळ गावी नेण्यात आले

logo
marathi.freepressjournal.in