ओएनजीसी कंपनीकडून अवैध सर्वेक्षण; बोटी जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मच्छीमारांची मागणी

समुद्रात सुरू असलेले सर्वेक्षणाची महिती जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाला नसल्याचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले
ओएनजीसी कंपनीकडून अवैध सर्वेक्षण; बोटी जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मच्छीमारांची मागणी

वाडा : पालघर जिल्हा सागरीकिनारी ओएनजीसी कंपनीकडून जिल्ह्यातील डहाणू किनारी भागात अवैध सर्वेक्षण सुरू झाल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पालघर जिल्हा युवा अध्यक्ष अनुज विंदे यांच्याकडून करण्यात येतो आहे.

सदर सर्वेक्षण बेकायदेशीर असल्याकारणाने देशाच्या आणि राज्याच्या सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मासेमारी नौका जर अश्या बेकायदेशीर सर्वेक्षणात भाग घेत असतील, तर त्या बोटींचा मासेमारी परवाना रद्द करण्याचे कायद्यात प्रयोजन आहे. सदर बोटी जप्त करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची स्थानिक मच्छीमारांनी मागणी केली आहे. पालघर मत्स्यव्यवसाय विभागाला दिनांक १७/०१/२०२४ रोजी पालघर जिल्ह्यात साईस्मिक सर्वेक्षण पालघर पासून खोल समुद्रात १४० की.मी अंतरावर होणार असल्याचे पत्राद्वारे कळवले असताना डहाणू तालुक्यातील समुद्रात ओएनजीसीच्या साइस्मिक सर्वेक्षणाच्या नावाखाली सर्वेक्षण सुरू असल्याचे स्थानिक मच्छीमारांनी प्रत्यक्ष पाहिले असल्याने हे सर्वेक्षण वाढवण बंदर उभारणीसाठी तर नाहीना असा सवाल डहाणू परिसरात केला जात आहे.

समुद्रात सुरू असलेले सर्वेक्षणाची महिती जिल्हा मत्स्यव्यवसाय विभागाला नसल्याचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी मच्छीमारांच्या शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे पालघर जिल्हा युवा अध्यक्ष अनुज विंदे यांनी दिली.

जिल्ह्यात वाढवण बंदरविरोधी भूमिका अधिक तीव्र असताना समुद्रात सर्वेक्षण बेकायदेशीर अशा पद्धतीने छुपे सर्वेक्षण झाल्याने समुद्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने तसेच मच्छीमारांना या क्षेत्रात मासेमारी करण्यास मज्जाव घालण्यात असल्याकारणाने मच्छीमार समिती आणि डहाणू येथील मच्छीमारांनी मत्स्यव्यवसाय विभागाला कार्यवाही करण्याचे निवेदन देण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in