भिवंडी : भिवंडी तालुक्यातील लामज - साक्रोळी येथील रस्त्याच्या पलीकडील वनखात्याच्या जमिनीतून अवजड वाहनांकरिता रस्ता तयार करून अनधिकृतपणे वाहतूक केली जात आहे. परंतु सदर बाबीकडे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
लामज - साक्रोळी रस्त्याच्या मध्यभागी पलीकडील बाजूस वन विभागाची जागा आहे. सदर जागेच्या लगतच रस्त्याचे काम सुरू आहे.त्या रस्त्याच्या कामाच्या डबर वाहतुकीसाठी वनखात्याच्या जागेतून अवैधपणे रस्ता तयार करण्यात आला आहे.त्यामुळे या वाहतुकीमुळे लामज - साक्रोळी गावातील नागरिकांच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे कण शिरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दरम्यान सदर गोष्टीकडे वनविभाग कानाडोळा करत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून, उपाययोजना करून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
सद्यस्थितीत मी सुट्टीवर आहे. याबाबत मला काही कल्पना नाही. मी कामावर रुजू झाल्यावर पाहणी करून सदर बाबीची चौकशी करण्यात येईल.
रमेश केंद्रे, वनरक्षक