
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत पोखरण रोड नं. २ येथे मौजे माजिवडे येथे विकास प्रस्ताव क्र. एस ०४- ०१८३-२० (प्लॉट बी) सेक्टर ४, फेज १,२ व ३ अंतर्गत अर्जदार विकासक यांनी चार टप्प्यात १३०० वृक्षतोडीला परवानगी मागितली होती. परंतु संबधीत विकासकाने २०२० ते २०२४ या कालावधीत वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घेण्याआधीच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्याचा आरोप ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी केला आहे. या संदर्भातील गुगल इमेज त्यांनी काढली असून ते पुरावे म्हणून महापालिका आयुक्त सौरभ राव यांना तक्रारीसह सादर केले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
या तक्रारीचे निवेदन त्यांनी नुकेतच महापालिका आयुक्तांना सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विकासकाने चार टप्प्यात १३०० वृक्षतोडीला परवानगी मागितली होती. त्यावर महापालिकेने सूचना हरकती मागविल्या होत्या. वृक्ष प्राधिकरण विभागाचे माजी सदस्य विक्रांत तावडे यांनी हरकत दाखल केली होती. परंतु त्यांच्या या तक्रारीची दखल अद्यापही घेण्यात आलेली नाही.
या प्रकरणात वनविभागाने देखील यापूर्वीच आक्षेप घेतलेला आहे. दुसरीकडे आता या प्रकरणात तावडे यांनी पुन्हा महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार केला आहे. त्यानुसार या प्रकरणात सदर भूखंडावर गुगल मॅपिंगद्वारे शोध घेतला असता २०२० मध्ये कोविडपूर्व काळात सुमारे ४ हजार वृक्ष दिसून येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र कोविड काळात यातील वृक्षांची बऱ्याच मोठ्या प्रमाणात विनापरवानगी कत्तल केल्याचे दिसत आहे.
या संदर्भातील २०२० व २०२४ गुगल सॅटेलाइट इमेजच्या प्रती त्यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे सादर केल्या आहेत. या भूखंडावर वृक्ष प्राधिकरण विभागाची परवानगी घेण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आलेली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या संदर्भात आवाज उठविल्यानंतर विकासकाने त्यावर पांघरूण घालून वृक्ष प्राधिकरणाकडे पूर्ण भूखंडापैकी एका तुकड्याचा वृक्षतोड, वृक्षरोपणाचा प्रस्ताव सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यातही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्यांचा अहवाल सादर केला. मात्र हा अहवाल धुडकावून लावत त्या बदल्यात वृक्षतोड पुनर्रोपण कंत्राटे मिळविण्यात आल्याचेही दिसून येत आहे. एकूणच या सर्व प्रकरणात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.