उल्हासनगर पालिकेचे उद्यान गेले चोरीला! सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले होते उद्घाटन

उल्हासनगर कॅम्प चारमधील व्हीनस चौक येथे वर्षानुवर्ष पंधरा ते वीस भाजी विक्रेते कलानी सोसायटीच्या भिंतीला हातगाडी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. २०१९मध्ये स्थानिक भाजपा नगरसेवक शेरी लुंड यांनी या भाजी विक्रेत्यांची महापालिकेकडे वारंवार तक्रार करून त्यांना तिथून हटविले.
उल्हासनगर पालिकेचे उद्यान गेले चोरीला! सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले होते उद्घाटन

उल्हासनगर : २०१९मध्ये उल्हासनगर महापालिकेने जवळपास १५ ते २० लाख रुपये खर्च करून व्हीनस चौक येथे एक उद्यान उभारले होते. हे उद्यान आता दिसेनासे झाले आहे. उद्यान चोरीला गेल्याची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

उल्हासनगर कॅम्प चारमधील व्हीनस चौक येथे वर्षानुवर्ष पंधरा ते वीस भाजी विक्रेते कलानी सोसायटीच्या भिंतीला हातगाडी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. २०१९मध्ये स्थानिक भाजपा नगरसेवक शेरी लुंड यांनी या भाजी विक्रेत्यांची महापालिकेकडे वारंवार तक्रार करून त्यांना तिथून हटविले. त्या ठिकाणी १५ ते २० लाखांचा निधी मिळवत विकास रस्त्यावर उद्यान उभे केले. त्यावेळी गरीब मराठी भाजी विक्रेत्यांनी या उद्यानाला विरोध केला होता. विशेष म्हणजे, या भाजी विक्रेत्यांकडे २० ते ३० वर्षे जुनी वीज जोडणीची कागदपत्रे होती; मात्र या भाजी विक्रेत्यांना स्थानिकांचा विरोध असून, तिथे त्यांना उद्यान हवे आहे, असे दाखवत जोर जबरदस्तीने उद्यान उभारण्यात आले. या उद्यानाच्या उदघाटनाचा कार्यक्रम ५ मार्च २०१९ला सायंकाळी पार पडला होता. या कार्यक्रमाला तत्कालीन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर, नगरसेवक शेरी लुंड अन्य व्यक्ती उपस्थित होते.

त्यानंतरच्या काळात कलानी सोसायटी पुनर्विकासासाठी सी ग्रीन या गृह प्रकल्प विकसित करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाकडे गेली. या बांधकाम व्यवसायिकाने त्याच्या प्रकल्पामध्ये समोरच्या बाजूला व्यावसायिक गाळे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याची शहरात चर्चा आहे. व्यावसायिक गाळ्यांच्या समोर जर उद्यान असेल, तर ग्राहक कुठून येतील, परिणामी व्यवसायिक गाळांची विक्री होणार नाही, हे ज्ञात असलेल्या बांधकाम व्यवसायिकाने पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरत उद्यान हटविण्याचा कट रचल्याची शहरात चर्चा आहे. त्या कटाप्रमाणे रविवारी सुट्टीच्या दिवशी उद्यान रस्त्यावरून हटविलेही गेले आहे; मात्र या संपूर्ण विषयावर हे उद्यान उभारण्यात अग्रेसर असलेले शेरी लूंड हे चुपी साधून बसले आहेत, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

याबाबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून सात दिवसांत पालिका आयुक्तांकडे अहवाल सादर करणार असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in