शहापूरातील बोगस भात खरेदी घोटाळ्यातील केंद्रप्रमुखाला अटक; हेमंत शिंदे यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या आधारभूत भात खरेदी योजनेत मौजे-चारिव केंद्रामध्ये सुमारे १ कोटी ५६ लाख २९९ रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने महामंडळातर्फे चारीव कंत्राटी केंद्रचालक हेमंत शिंदे यांच्यावर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहापूरातील बोगस भात खरेदी घोटाळ्यातील केंद्रप्रमुखाला अटक; हेमंत शिंदे यांना ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

शहापूर : शहापूर तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी दरवर्षी एक-ना-अनेक कारणांनी गाजत असते. या महामंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या आधारभूत भात खरेदी योजनेत मौजे-चारिव केंद्रामध्ये सुमारे १ कोटी ५६ लाख २९९ रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याने महामंडळातर्फे चारीव कंत्राटी केंद्रचालक हेमंत शिंदे यांच्यावर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा गुन्हा आदिवासी विकास महामंडळाच्या भात खरेदी आणि बारदानबाबत तफावत असल्यामुळे व शेतकऱ्यांना भात खरेदीबाबत खोट्या पावत्या दिल्यामुळे दाखल करण्यात आला होता.

बनावट पावत्यांमार्फत भात खरेदी दाखवून शहापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची एक कोटी रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या शहापूर आदिवासी विकास महामंळातील कंत्राटी केंद्रप्रमुख हेमंत शिंदे यास पुणे जिल्ह्यातील मंचर येथून मोठ्या शिताफीने किन्हवली पोलिसांनी अटक केली. आपणास कधीही अटक होणार म्हणून त्याने पुणे जिल्ह्यातील मंचर गाठून एका हॉटेलमध्ये तो वेटर बनला होता. त्या ठिकाणी किन्हवली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद सुरलकर, तुकाराम ठोंबरे, अर्जुन पारधी यांचे पथक जावून शिंदे असलेल्या हॉटेलमध्ये हेमंत शिंदे यांची ओळख पटताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या व त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आदिवासी विकास महामंडळातर्फे शहापूर तालुक्यात आधारभूत खरेदी योजनेनुसार भात शेतकऱ्यांकडून खरेदी केली जाते. चालू वर्षी शहापूर तालुक्यात भात खरेदी केंद्रात हजारो क्विंटल भाताची खरेदी केलेल्या १३ हजार ४४१ क्विंटल भातामध्ये २ हजार ९९५ क्विंटल भाताच्या मालामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आली असून ७५९९ बारदाणाचीही तफावत आली आहे. बनावट पावत्या बनवून शेतकऱ्यांची व आदिवासी विकास महामंडळाची फसवणूक करून सुमारे १ कोटी ५६ लाख २९९ रुपयांचा घोटाळा केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. भात मालाची तफावत आल्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचे शहापूर उपव्यवस्थापक सागर सोनवणे यांनी २५ मे २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता. या बाबतचा अधिक तपास पोलीस करत होते.

मागील वर्षी सुद्धा करोडो रुपयांचा भात खरेदी घोटाळा झाला होता. याबाबत सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे. भात खरेदी केंद्र चालविणारे जे सोसायटीचे चेअरमन व सचिव यांची उच्च पातळीवरून चौकशी होण्याची शेतकरी मागणी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in