मोखाड्यातील पशुधन रामभरोसे! फऱ्या रोगामुळे ३ जनावरांचा मृत्यू; २ अत्यवस्थ

खोडाळा येथे एकमेव महिला पशूधन विकास अधिकारी कार्यरत असून, त्यांच्या हाताखाली एकही कर्मचारी नाही.
मोखाड्यातील पशुधन रामभरोसे! फऱ्या रोगामुळे ३ जनावरांचा मृत्यू; २ अत्यवस्थ

दीपक गायकवाड / मोखाडा : खोडाळा येथील बाळू हमरे यांचे २ बैल, रामु कवर यांचा १ बैल अशा ३ जनावरांचा फऱ्या रोगामुळे मृत्यू झाला आहे, तर विजय अनंता वाघ यांच्या २ गाई अत्यवस्थ झालेल्या आहेत. खोडाळा आणि परिसरात कोणत्याही प्रकारचे लसीकरण झालेले नाही. त्यामुळेच फऱ्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, खोडाळा पंचक्रोशीतील जनावरांचे आरोग्य हे रामभरोसे झाले आहे.

खोडाळा येथे एकमेव महिला पशूधन विकास अधिकारी कार्यरत असून, त्यांच्या हाताखाली एकही कर्मचारी नाही. ऑनलाईन रिपोर्टींग, तालुक्यातील मीटिंग यामुळे प्रस्तुत अधिकाऱ्यांना मूळ पदावरील सेवा पूर्णपणे बजावणे शक्य होत नाही. त्याशिवाय एकट्याने लसीकरण करणेही दुरापास्त होत असल्याने खोडाळा आणि पंचक्रोशीतील जनावरांचे आरोग्य हे रामभरोसे झाले आहे. मोखाडा तालुक्यात ५९ महसुली गावे आणि २२२ पाडे असून, लोकसंख्येच्या प्रमाणात जित्राबांची संख्या आहे. प्रत्यक्ष खेड्यापाड्यावर काम करण्यासाठी कर्मचारीच नसल्याने आहेत त्याच कर्मचाऱ्यांना एवढ्या विस्तारीत क्षेत्रात काम करताना जनतेच्या रोषाला सामोरे जात सेवा द्यावी लागत असल्याने तातडीने येथील अनुशेष भरण्याची मागणी सन २०२१ पासून होत आहे. सन २०२१ साली उधळे हट्टीपाडा परिसरात लक्षणीय संख्येने जनावरे दगावली होती. त्यानंतरही जनावरांचे आकस्मिक मृत्युसत्र सुरूच होते. तत्कालीन परिस्थितीत जिल्हा परिषदेने करारावर मानद पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्ती केली होती. परंतु त्यांचाही करार संपला असून, आता तालुक्यातील एकूणच जनावरांचे आरोग्य बाधीत झालेले आहे. याबाबत मोखाडा पंचायत समितीशी संपर्क साधला, येथे कार्यरत असलेले विस्तार अधिकारी डॉ. सचिन भालचिम यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, तर खोडाळा पशुधन विकास अधिकारी डॉ. क्षितीजा मोरे या यांनी उशीराने या ठिकाणी भेट दिली असून, लगोलग लसीकरण मोहीम हाती घेणार असल्याचे मोरे यांनी सांगितले आहे.

पशुसंवर्धन विभागात असंख्य पदे रिक्त

मोखाडा तालुक्यात पशुसंवर्धन विभागात असंख्य पदे रिक्त आहेत. ही पदे भरून आदिवासींचे पशुधनाला वेळेवर उपचार मिळावेत. तसेच आदिवासी बांधवांच्या पशुधनाची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी तातडीने योग्य ती उपाययोजना करून शेतीला एकमेव आधार असलेल्या पशुधनाच्या मरतुकीचे प्रमाण रोखावे.

- उमेश येलमामे, उपसरपंच, ग्रामपंचायत कार्यालय, खोडाळा

logo
marathi.freepressjournal.in