ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी पालिकेकडून कामांना तत्त्वत: मंजुरी

या बैठकीमध्ये ठाणे रेल्वेस्थानकामध्ये आधुनिक पध्दतीने करण्यात येणाऱ्या पुनर्विकास कामाचे सादरीकरण करण्यात आले.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी पालिकेकडून कामांना तत्त्वत: मंजुरी
Published on

ठाणे : ठाणेकर नागरिकांचा प्रवास अधिक सुकर व्हावा किंबहुना रेल्वेस्थानक परिसरात होत असलेल्या गर्दीचे नियोजन व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या अनुषंगाने महापालिकेशी संबंधित विभागांच्या परवानग्या आवश्यक असून, या संदर्भात रेल्वेचे अधिकारी व महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बैठक शुक्रवारी नुकतीच पार पडली. ठाणे रेल्वेस्थानकातील प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबरच अद्ययावत सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून हाती घेण्यात आलेल्या कामामध्ये महापालिकेचा सहभाग महत्वाचा आहे. या प्रस्तावित कामाचा अंतिम आराखडा तयार करत असताना यामध्ये महापालिकेने देखील संबंधित विभागाचे तत्त्वत: मंजुरी देत असल्याचे आयुक्तांनी या बैठकीत नमूद केले.

या बैठकीमध्ये ठाणे रेल्वेस्थानकामध्ये आधुनिक पध्दतीने करण्यात येणाऱ्या पुनर्विकास कामाचे सादरीकरण करण्यात आले. या अंतर्गत सद्यस्थित असलेल्या ११ प्लॅटफॉर्मवर पूर्व- पश्चिम जोडणारा भव्य डेक तयार करण्यात येणार आहे. या डेकमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्याबरोबर सुरक्षितताही राखली जाणार आहे. या डेकवर प्रवाशासांठी आवश्यक प्रतीक्षागृह, तिकीटघर, शौचालय आदी सेवासुविधा उपलब्ध असणार आहेत. सदरचा डेक हा ठाणे पश्चिम व पूर्वेकडील सॅटिस प्रकल्पाला जोडला जाणार आहे. तसेच रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या बाहेरील बाजूकडील जागेत दोन व चार चाकी वाहनांसाठी बहुमजली पार्किंग प्लाझा, तीन ते चार व्यावसायिक इमारतीचे बांधकाम रेल्वेमार्फत करण्यात येणार आहे.

सदर कामांचा प्रस्ताव तयार करत असताना महापालिकेच्या अग्निशामक विभाग, उद्यान विभाग, मलनिस्सारण व शहर विकास विभागाची परवानगी आवश्यक असल्याचे बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आले. सदर कामांची तत्त्वत: मंजुरी महापालिकेच्या वतीने देण्यात येईल, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट करून तशा प्रकारचा पत्रव्यवहार करण्याचे आदेश प्रशासनास दिले.

पूर्वेला बस टर्मिनसचा प्रस्ताव

सद्यस्थितीत ठाणे पूर्व येथे सॅटिसचे काम सुरू असल्यामुळे प्रवाशांचा अतिरिक्त ताण हा पश्चिमेकडील बाजूस येत आहे. ठाणे पूर्व येथील पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या ८ ते १० महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण होईल, त्याचबरोबर पूर्वेला बस टर्मिनसचा प्रस्ताव आहे, त्यानुसार पूल व बस टर्मिनस पूर्ण झाल्यावर पूर्वेकडील वाहतूकही सुरळीत होण्यास मदत होणार, असे आयुक्तांनी यावेळी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in