रायगडमध्ये दिव्यांगांच्या आकडेवारीत सावळागोंधळ; निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत सत्यता नसल्याचा संघटनांचा आरोप

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टिने सक्षम ॲपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
 रायगडमध्ये दिव्यांगांच्या आकडेवारीत सावळागोंधळ; निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत सत्यता नसल्याचा संघटनांचा आरोप

धनंजय कवठेकर/अलिबाग

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आठ हजार मतदार असल्याचा दावा निवडणूक विभागाने केला आहे; मात्र, या आकडेवारीत सावळागोंधळ असल्याचे दिव्यांग संघटनेकडून बोलले जात आहे. प्रत्यक्षात १७ हजारांहून अधिक मतदार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे हा प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी होतील का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. मतदान केंद्रांपासून, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, ८५ वर्षांवरील मतदार आदी अनेक मतदारांची माहिती घेऊन त्यांना मतदान करण्यास कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तालुका व विधासभा स्तरावर मतदारांची माहिती घेण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ४० टक्क्यांहून अधिक दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींसाठी आणि ८५ वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टिने सक्षम ॲपच्या माध्यमातून अधिकच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रायगड मतदारसंघात एकूण ८ हजार ४६ दिव्यांग मतदार आहेत. यापैकी २ हजार ९३३ महिला, तर ५ हजार १३३ पुरुष मतदार आहेत, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे; मात्र, या आकडेवारीत सत्यता नसल्याचे संघटनेच्या माध्यमातून सांगितले जात आहे. मागील कालावधीत १२ हजार मतदार होते. मग आता दिव्यांग मतदार संख्या कमी कशी झाली, असा सवाल संघटनेकडून उपस्थित केला जात आहे.

यूआयडी प्रमाणपत्रानुसार जिल्ह्यात १८ वर्षांवरील १७ हजारांहून अधिक मतदार असल्याचा दावा दिव्यांग संघटनेने केला आहे. त्यामुळे ही आकडेवारी कमी असल्याचे त्यांच्याकडून बोलले जात आहे.

दिव्यांग मतदार चिन्हांकित झाले नाहीत. आठ हजारांच्या आकडेवारीत तफावत आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

- साईनाथ पवार,

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य

दिव्यांग कर्मचारी संघटना

रायगड लोकसभा मतदारसंघात असलेली दिव्यांग मतदार यादी जिल्हा रुग्णालयाकडून प्राप्त झाली आहे. ही आकडेवारी कमी-जास्त असल्याची माहिती घेण्याचे काम तालुका स्तरावर सुरू आहे.

- स्नेहा उबाळे,

उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in