जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

ठाणे रेल्वे स्टेशनच्या पल्याडचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे.
जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

- अतुल जाधव

ठाणे दर्पण

ठाणे रेल्वे स्टेशनच्या पल्याडचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. खचाखच भरलेल्या लोकल आणि दरवाजाच्या बाहेर लोंबकळत असलेले रेल्वे प्रवासी असे चित्र आता नेहमीचे झाले आहे. रेल्वेच्या गर्दीने सात दिवसांत तीन बळी घेतले आहेत. मात्र प्रचारात गुंग असलेल्या राजकीय नेत्यांना याचे काहीच सोयरसुतक नसून लोकलमधील गर्दी आता अधिकच जीवघेणी होत चालली असल्याने रेल्वे प्रवास देखील धोकादायक झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

ठाणे शहराच्या पुढील असलेल्या शहरांचा अवाका वाढत चालला असून बदलापूर-अंबरनाथनंतर आता थेट कर्जत-कसारापर्यंत शहरांचा विस्तार होत चालला आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात नवीन शहरांची निर्मिती होत असून बदलापूर, कसारा, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, दिवा या परिसरात नागरीकरणाचा वेग प्रचंड आहे. स्वस्त आणि मस्त घरे मिळत असल्याने या परिसरात घरे घेण्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. या पट्ट्यात नोकरदार वर्गाचा टक्का वाढत असून टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी हजारो चाकरमानी सकाळ उजाडताच मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने धाव घेतात यांना रेल्वे वाहतुकीशिवाय स्वस्त आणि जलद पर्याय उपलब्ध नसल्याने लोकलमध्ये धक्के खात, लोंबकळत जसा मिळेल तसा प्रवास करून घर अथवा कार्यालय गाठण्यासाठी रोज लढाई करावी लागते.

दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीत राहणाऱ्या तरुणीचा लोकलमधून प्रवास करताना तोल जाऊन पडून मृत्यू झाला. रिया राजगोरे ही तरुणी डोंबिवलीहून लोकलने मुंबईला कामाला निघाली होती. नेहमीप्रमाणे ती डोंबिवली रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढली. मात्र लोकलमध्ये गर्दी असल्याने रियाने दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास केला. कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान रियाचा तोल जाऊन ती खाली पडली, त्यात तिचा मृत्यू झाला.

लाखो रेल्वे प्रवासी दरवर्षी रेल्वेला करोडो रुपयांचा महसूल मिळून देतात, मात्र त्यांचा जीवाचे मोल शून्य आहे. मागील दोन वर्षांत तीसपेक्षा जास्त रेल्वे प्रवाशांचा रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाले आहेत. तरीही रेल्वे प्रशासनाला त्यांच्या मृत्यूचे गांभीर्य नाही. ठाणे पल्याड रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका टाकण्यात आली, मात्र त्याचा फायदा रेल्वे प्रवाशांना झाल्याचे अजूनतरी बघण्यात नाही.

लोकल गर्दीवर तोडगा काढण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असून त्याचा रेल्वे विभागाकडे अभाव आहे. सध्या असलेल्या वेळापत्रकाची काटेकोर अंमलबजावणी केली तरी रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकतो. लोकल निर्धारित वेळेपेक्षा उशिरा धावणे हे नित्याचेच झाले आहे. मध्य रेल्वे आणि उशीर हे जणू नित्याचेच झाले आहे. त्यामुळे आधीच उशीर झालेल्या प्रवाशांची गाडीत चढण्यासाठी कसरत सुरू होते. अनेकदा रेल्वेच्या उशिराबाबत घोषणा केली जात नाही आणि पुढील ट्रेन किती वेळानंतर आहे हे देखील सांगितले जात नसल्याने अधिकच हाल होतात. रेल्वे प्रशासनाने याबाबत तातडीने काही हालचाली न केल्यास रेल्वे प्रवाशांचे बळी जात राहणार हे ही खरेच आहे. मात्र आगामी काळात या घटनांमध्ये वाढ झाल्यास भविष्यात रेल्वे प्रवाशांच्या मोठ्या संतापाला सामोरे जावे लागणार आहे. या संदर्भात दिवा रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वे प्रवाशांनी केलेल्या उत्स्फूर्त आंदोलनाची आठवण रेल्वे प्रशासनाला करून देणे आवश्यक आहे.

समांतर रस्त्याचे केवळ दिवास्वप्न

ठाणे ते डोंबिवली रेल्वेला समांतर रस्त्याची मागणी रेल्वे प्रवाशांकडून सतत होत असली तरी त्याला चालना मिळत नसल्याने या प्रकल्पाची केवळ चर्चाच जोरात सुरू आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर याबाबत फक्त घोषणांचा पाऊस पडतो, मात्र पुढे पाढे पंचावन्न अशी अवस्था आहे. रेल्वेला समांतर रस्ते मार्ग झाल्यास रेल्वे प्रवाशांना पर्याय उपलब्ध होऊन रेल्वेवर असलेला भार कमी होईल. मात्र समांतर रस्त्याची सध्या फक्त चर्चाच सुरू असल्याने समांतर रस्ता दिवास्वप्नच ठरले आहे.

सात दिवसांत तीन बळी

अलीकडे डोंबिवली ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. राहुल अष्टेकर असे मृत प्रवाशाचे नाव आहे. याआधी डोंबिवली स्टेशनवरून लोकलने प्रवास करणाऱ्या अवधेश दुबे, रिया राजगोर यांच्यावर गर्दीमुळे दरवाजात लोंबकळण्याची वेळ आली आणि तीच वेळ जीवघेणी ठरली. गेल्या सात दिवसांमधला हा तिसरा बळी लोकलच्या गर्दीने घेतला आहे. यातील दोन रेल्वे अपघातांची नोंद डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात, तर तिसऱ्या अपघाताची नोंद ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in