ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुलावरील घटनेत फेरीवाल्यांकडून महिलेला मारहाण

या प्रकरणी कडक कारवाईची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.
ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुलावरील घटनेत 
फेरीवाल्यांकडून महिलेला मारहाण

ठाणे रेल्वे स्थानकात फेरीवाल्यांच्या मुजोरीत दिवसेंदिवस वाढ होत असून, रेल्वे पुलावर चालताना बाकड्याचा अडथळा होत असल्याने फेरीवाल्याला विचारणा करणाऱ्या एका महिलेला फेरीवाल्यांच्या टोळीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. या महिलेवर चार ते पाच जणांच्या टोळीने हल्ला केला असला, तरी केवळ दोघा फेरीवाल्यांनाविराधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणी कडक कारवाईची मागणी भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी केली आहे.

वर्षा पाटील (वय ५२) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या रविवारी सायंकाळी दादरहून ठाण्यात परतत होत्या. त्या प्लॅटफॉर्म क्र. ५ वरून जुन्या रेल्वे पुलावर आल्यानंतर, प्लॅटफॉर्म क्र. ७ ते ८ वरील पुलावर एका फेरीवाल्याच्या बाकड्याला धक्का लागला. त्यावेळी त्यांनी फेरीवाल्याला बाकडे बाजूला करण्यास सांगितले.

मात्र, त्याने अरेरावी सुरू केली. त्यावेळी वर्षा पाटील यांनी रेल्वे पोलिसांना फोन करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या फेरीवाल्याने त्यांना शिवीगाळ करण्यात सरुवात केली. काही क्षणातच तेथे बाळू भालचंद्र डोकरे हा साथीदारांसह आला. त्यानंतर त्याने व त्याच्या चार ते पाच साथीदारांनी वर्षा यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. दुर्देवाने या प्रकारावेळी एकही प्रवासी मदतीला धावला नाही. कोपरीतील एका रहिवाशाने स्थानिक महिला असल्याचे सांगून फेरीवाल्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, फेरीवाल्यांनी मारहाण सुरूच ठेवली होती.

अखेर काही वेळानंतर रेल्वे पोलीस आल्यानंतर मारहाण थांबविण्यात आली. त्यानंतर बाळू डोकरे याच्या इशाऱ्यानंतर चार ते पाच फेरीवाले पळून गेले.

तर पोलिसांनी बाळू डोकरे व मारहाणीत सहभागी नसलेल्या एका म्हाताऱ्या फेरीवाल्याला अटक केली. या प्रकारात वर्षा पाटील यांचे ७५ हजारांचे मंगळसूत्रही चोरीला गेले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे ठाणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांची मुजोरी कायम असल्याचे चित्र आहे. या घटनेबाबत रेल्वे पोलिसांकडून प्रसारमाध्यमांकडे कोणतीही वाच्यता केली गेली नाही. मात्र, भाजपाचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांना हा प्रकार मंगळवारी दुपारी समजल्यानंतर, त्यांनी वर्षा पाटील यांची भेट घेऊन विचारपूस केली. या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी वाघुले यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in