मोखाड्यातील शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व मशागतीची लगबग; शेतीच्या कामांना वेग

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जरी जूनमध्ये सुरू होत असला, तरीही त्याची पूर्वतयारी मात्र एप्रिल महिन्यापासूनच सुरू करण्यात येते. सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहेत. त्यातच राज्यात अधुनमधून अवकाळी पाऊस पडत आहे.
मोखाड्यातील शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व मशागतीची लगबग; शेतीच्या कामांना वेग

दीपक गायकवाड/ मोखाडा

भात, नागली, वरई उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या मोखाडा तालुक्याच्या ग्रामीण भागांत बळीराजाची पेरणीपूर्व राब भाजणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, भात शेतीच्या तुटलेल्या बांध बंधिस्तीची कामे देखील सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. भात, नागली व वरईचे बियाणे पेरणी करण्यापूर्वी शेतातील एका कोपऱ्यात पालापाचोळा, गोवऱ्या, खत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून दिले जाते. त्यामुळे जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जाऊन जमिन भुसभुशीत होत असते. त्यानंतर पावसाळा सुरू होण्याचे संकेत मिळाले की, राब तयार केलेल्या ठिकाणी भात, नागली व वरई पिकांच्या बियाणांची पेरणी केली जाते.

शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जरी जूनमध्ये सुरू होत असला, तरीही त्याची पूर्वतयारी मात्र एप्रिल महिन्यापासूनच सुरू करण्यात येते. सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहेत. त्यातच राज्यात अधुनमधून अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे आता अवकाळी पावसाच्या रूपाने हजेरी लावणारा पाऊस जुलै, ऑगस्ट महिन्यात दांडी मारतो की काय अशी भीती सुद्धा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कारण जुलै महिन्यापासून शेतकरी शेतात तयार झालेल्या पिकांची लागवड करत असतो. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनही बिघडण्याची भीती त्यांना आहे.

सध्या शेतीच्या कामांना ग्रामीण भागात वेग आला असून, शेतकरी कुटुंबाने काडीकचरा वेचून बांधावरील झाडेझुडपे साफ करणे, आवणांचे तुटलेले बांध बंधिस्तीची दुरुस्ती करणे आदी कामे सुरू केली आहेत. ग्रामीण भागात जरी शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरली असली, तरी देखील शेतीच्या कामासाठी बैलजोडीची गरज भासते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही, असे शेतकरी बैलजोडी खरेदी करण्यासाठी कधी गाव पाड्यांना, तर कधी घोटी येथील बैल बाजारात हेलपाटे मारत आहेत.

यावर्षी पाऊस लवकरच पडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे पावसाला सुरुवात होण्यापूर्वीच भात, नागली, वरई पिकासाठी राब भाजणीची शेतीची कामे संपायला घेतली आहेत. तर पाऊस पडायच्या आधी पावसाळ्यात लागणारा फोडून ठेवलेला लाकूड फाटा, गुरांसाठी ठेवलेले पैढा, वैरण पाऊस पडण्याच्या आधी घरात साठवायला सुरुवात केली आहे.

-उमाकांत गणपत हमरे, प्रगतशील शेतकरी, खोडाळा

पर्यावरण संरक्षणातून शेती संवर्धन

आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्यांची गरज भासते; मात्र अशा कामासाठी येथील शेतकरी झाडे न तोडता उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या तोडतात, त्याचसोबत गवत, खत व इतर सुका पालापाचोळा एकत्र करून जाळतात. यात कोणत्याही प्रकारचा प्लास्टिक किंवा हानिकारक ज्वलनशील पदार्थ नसतो. त्यामुळे पर्यावरण संरक्षण, तर केले जातेच, शिवाय जमिनीचा पोतही सुधारण्यासाठी मदत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in