गतिरोधक हटवल्याने अपघातात वाढ; आयआरसीच्या नियमानुसार गतिरोधक बसवणार कधी?

शहरात जे गतिरोधक बांधण्यात आले होते ते सर्व गतिरोधक हे आयआरसीच्या नियमानुसार बांधण्यात आलेले नव्हते. याशिवाय काही गतिरोधक कमी उंचीचे तर काही गतिरोधक हे जास्त उंचीचे बांधण्यात आले होते.
गतिरोधक हटवल्याने अपघातात वाढ; आयआरसीच्या नियमानुसार गतिरोधक बसवणार कधी?

ठाणे : आयआरसीच्या नियमानुसार नसलेले आणि वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरलेले ठाणे शहरातील १०० पेक्षा अधिक गतिरोधक ठाणे महापालिकेने काढले आहेत. मात्र हे काढलेले गतिरोधक पुन्हा बांधण्यात आलेच नसल्याने शहरात अपघाताचे प्रमाण वाढल्याची चित्र पहावयास मिळत आहे. शहरातील काही ठिकाणी तसेच खारीगांव परिसरातही यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातांमध्ये मोटारसायकलस्वारांचे प्रमाण जास्त असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. त्यामुळे काढलेले गतिरोधक आयआरसीच्या नियमानुसार पुन्हा केव्हा बसवणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कार्यकारी अभियत्यांनी आपापल्या विभागात ड्राईव्ह घेऊन जे गतिरोधक आयआरसीच्या नियमानुसार नाहीत त्याची यादी करण्याचे निर्देश नुकतेच पदमुक्त झालेले पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. त्याचसोबत रबराचे स्पीडब्रेकर असतील ते काढून टाकण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. ज्या ठिकाणी तात्पुरते गतिरोधक बसवायचे असतील तर ते देखील आयआरसीच्या नियमानुसार बसवावेत, तसेच शहरातील सर्व गतिरोधक आयआरसीच्या नियमानुसार असतील याची सर्वांनी दक्षता घेण्याची सूचनाही त्यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार दीड महिन्यांपूर्वी आयआरसीच्या नियमानुसार नसलेले आणि चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले गतिरोधक काढून टाकण्याची कारवाई ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. यामध्ये १०० पेक्षा अधिक गतिरोधक काढून टाकण्यात आले असल्याची माहिती पालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी दिली आहे, तर आयआरसीच्या नियमानुसार शास्त्रशोक्त पद्धतीने गतिरोधकही बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र ज्या ठिकाणी हे गतिरोधक काढण्यात आले आहे ते पुन्हा गतिरोधक बांधण्यात आले नसल्याने अनेक दुचाकीस्वारांचे अपघात होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. खारीगांवमध्ये अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून एका महिन्यातच दत्तवाडी, खारीगांव आणि पारसिक नगर परिसरात ६ ते ७ अपघात झाले आहेत. आपल्या विद्यार्थ्यांना दुचाकीवर शाळेत सोडणाऱ्या पालकांचा देखील यामध्ये समावेश असल्याची माहिती स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे हे काढलेले गतिरोधक आयआरसीच्या नियमानुसार पुन्हा लवकरात लवकर बांधण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

नवीन गतिरोधकची प्रतीक्षा

पूर्वी बांधण्यात आलेल्या गतिरोधकांवर डांबराचे आवरण असल्याने हे गतिरोधक लवकर खराब होत होते. मात्र आता नव्याने बांधण्यात येणाऱ्या गतिरोधकांवर मास्टिकचे आवरण लावण्यात येणार आहे. त्यामुळे याचा दर्जा देखील चांगला राहणार आहे. वाहनचालकांसाठी जे गतिरोधक त्रासदायक ठरत आहेत ते गतिरोधक शोधून ते देखील काढण्याची कार्यवाही सुरू असल्याचे पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले होते.

गतिरोधकांबाबतच्या तक्रारी?

शहरात जे गतिरोधक बांधण्यात आले होते ते सर्व गतिरोधक हे आयआरसीच्या नियमानुसार बांधण्यात आलेले नव्हते. याशिवाय काही गतिरोधक कमी उंचीचे तर काही गतिरोधक हे जास्त उंचीचे बांधण्यात आले होते. त्यामुळे कमी उंचीच्या गाड्या तर अक्षरशः या गतिरोधकांना घासून जात होत्या. परिणामी अनेक गतिरोधकांची दुरवस्था झाली होती. विशेष करून दुचाकीस्वारांसाठी हे सर्वच गतिरोधक घातक होते. यावर अनेक मोटारसायकलस्वारांचा तोल जाऊन अपघाताचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले गतिरोधक हटवण्याची मागणी अनेक वाहनचालकांकडून करण्यात आली होती

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in