तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात वाढ; शासनाच्या नियमांना 'तिलांजली'

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याप्रमाणे शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे.
तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात वाढ; शासनाच्या नियमांना 'तिलांजली'
PM

जव्हार : जव्हार शहर तथा ग्रामीण भागात विविध प्रकारच्या व्यसनांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून यामुळे तयार होत असलेली नवीन पिढी ही व्यसनांच्या जाळ्यात अडकल्याशिवाय राहणार नाही अशी खंत व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे सध्याची फॅशन सुगंधी तंबाखू सेवन करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे यात शासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे त्यामुळे शासनाचे कर्मचारी शासनाच्या नियमांना तिलांजली देत आहेत.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याप्रमाणे शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालयात नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, तालुक्यातील अनेक कार्यालयात नियमांना तिलांजली दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे.तंबाखू प्रतिबंध कायद्याच्या नियमांचे पालन कार्यालयीन परिसरात होत नसेल, तर त्याचा प्रभाव सामान्य नागरिकांवर कसा पडणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंध कायद्याप्रमाणे शासकीय निमशासकीय, खासगी कार्यालये, उपाहारगृहे व कार्यालयाचा परिसर इत्यादी सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन तथा धूम्रपान करणे व थुंकणे हे प्रतिबंधित करण्यात आले आहे. सदर बैठकीत याबाबत संपूर्ण राज्यभर प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना केली आहे. असे असतानाही याची अंमलबजावणी करण्याची जवाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या या गंभीरबाबीकडे दुर्लक्ष होत आहे.

अनेक शासकीय कार्यालयांमध्ये या नियम पाळले जात नसल्याचे चित्र आहे. अनेक कार्यालयात याबाबत फलकही लावण्यात आलेले दिसत नाही. त्याचप्रमाणे बऱ्याच कार्यालयांच्या भिंती रंगलेल्या तर कुठे पान, खऱ्याच्या पिचकाऱ्या व गुटखापुड्यांच्या रिकामे पॅकेट दिसतात. त्यामुळे या नियमांचे पालन कार्यालयीन कर्मचारी करीत नसेल अथवा कार्यालय परिसरात नियम पाळले नाही, तर त्याचा प्रभाव सामान्य नागरिकांवर कसा पडणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

शाळा, विविध शासकीय कार्यालये, रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह आदी सर्वच ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. धूम्रपान करताना आढळल्यास त्यावर कारवाई होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

- डॉ. किरण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, जव्हार

जव्हार शहर तथा ग्रामीण भागात पुरुषांप्रमाणे महिला देखील सर्रास तंबाखूच्या आहारी गेल्याचे चित्र आहे, तंबाखूचे व्यसन करताना तंबाखू भाजताना त्या पासून होणारा धूर व उग्रवास मानवी शरीराला हानिकारक असून त्यापासून कर्करोग होण्याची शक्यता आहे, हे माहीत असताना देखील इतरांना होणाऱ्या त्रासाचा विचारही त्यांच्या मनात येत नाही, त्यामुळे स्वतःच्या व्यसनाचा इतरांना नाहक त्रास होत आहे, यावर वरिष्ठ पातळीवर दंडात्मक कारवाईची उपाययोजना व्हावी.

- रवी गवते, सामाजिक कार्यकर्ते

logo
marathi.freepressjournal.in