रेडी मिक्स काँक्रीट प्लांटमुळे मीरा-भाईंदरच्या प्रदूषणात वाढ

हवेत उडणाऱ्या धुळीमुळे त्या भागातील अनेक रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.
रेडी मिक्स काँक्रीट प्लांटमुळे मीरा-भाईंदरच्या प्रदूषणात वाढ

भाईंंदर: मीरा-भाईंदर शहरातील सिमेंट प्लांट नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मीरा-भाईंदर शहरात सिमेंट प्लांट सुरू करण्यासाठी महापालिकेने परवानगी दिली आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई करत नसल्याचे मनपा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्यामुळे या सिमेंट प्लांटवर कारवाई करण्यास दोघेही टाळाटाळ करत आहेत. या सिमेंट प्लांटमुळे शहरातील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

मीरा-भाईंदर शहरातील घोडबंदर, काशिमीरा, चेना व भाईंदर भागात अनेक ठिकाणी इमारतीचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट प्लांट (रेडी मिक्स प्लांट ) उभारण्यात आले आहेत. हे प्लांट उभारताना रहिवासी क्षेत्रात उभारू नयेत असे स्पष्ट शासनाचे निर्देश असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेकडून या प्लांटला परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेने परवानगी दिल्यानंतरच प्रदूषण नियंत्रण महामंडळ परवानगी देते. या प्लांटला रहिवासी मोठ्या प्रमाणात विरोध करत असताना देखील महापालिका प्रदूषण नियंत्रण विभागाची कारवाई करण्याची जबाबदारी असल्याचे सांगत आपले हात झटकत आहे. त्यामुळे रहिवासी संताप व्यक्त करत आहेत. महापालिकेने सिमेंट प्लांटमधून धूळ व कचरा उडू नये, यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक केले आहे. परंतु याकडे सिमेंट प्लांट मालकाकडून दुर्लक्ष केले जात आहे. घोडबंदर व चेना गावातील रहिवासी यांना धुळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

हवेत उडणाऱ्या धुळीमुळे त्या भागातील अनेक रहिवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच रस्त्याने येता जाताना व घरात धुळीचे कण साचत असल्याने लहान मुले, वयोवृद्ध नागरिक, महिला यांना फुफ्फुसाचे व डोळ्यांचे आजार उद्भवत असल्याचे नागरिक सांगत आहेत. या सिमेंट प्लांटमधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाबाबत राज्य मानव अधिकार आयोगाकडूनही दखल घेत नियमांचे पालन न करणाऱ्या सिमेंट प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले होते.

त्यानंतर काही प्लांटची पाहणी करण्यात आली परंतु पुढे कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांनी संताप व्यक्त करत शहराचा विकास करत असताना नागरिकांच्या आरोग्याकडे देखील महापालिकेने लक्ष द्यावे व या प्लांटच्या प्रदूषणातून सुटका नागरिकांची सुटका कधी करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ या प्लांटमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगत आहे परंतु कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही पूर्वी जी परिस्थिती होती आजही तीच परिस्थिती आहे असा आरोप नागरिकांनी केला आहे.

● प्रतिक्रिया,

★ प्रताप सरनाईक - आमदार

शहरात सुरू असलेल्या रेडी मिक्स सिमेंट काँक्रीट प्लांटला महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी देऊ नये, हे सिमेंट प्लांट शहरापासून लांब असावेत महापालिकेने परवानगी दिली नाही तर हे सिमेंट प्लांट सुरूच होणार नाहीत. रहिवाशी क्षेत्रात प्लांटला दिलेल्या परवानग्या बेकायदेशीर आहेत. त्यामुळे हे सिमेंट प्लांट शहराच्या हद्दीबाहेर तात्काळ स्थलांतरित झाले पाहिजेत. त्या सिमेंट प्लांटवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

★ संजय काटकर - आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिका -

महापालिकेने उभारण्यात आलेल्या सिमेंट प्लांट संदर्भात महापालिका अधिनियम, शासन आदेशाप्रमाणे कारवाई करण्यात येईल तसेच प्रदूषण करणाऱ्या सिमेंट प्लांटला नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेने प्रदूषण करणाऱ्यावर कारवाई साठी समिती नेमली आहे. त्या समितीकडून पाहणी करण्याचे काम सुरू आहे. हे प्रदूषण कसे कमी करता येईल यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

logo
marathi.freepressjournal.in