
एप्रिल ते जून महिन्यात प्रचंड उष्णता असल्याने व सर्प, विंचू व श्वान यांचा प्रजनन कालावधी असल्याने संध्याकाळच्या, पहाटेच्या रात्रीच्यावेळी बिळातून सर्प व विंचू बाहेर पडत असल्याने खेड्यापाड्यात विंचू व सर्प दंशाच्या घटना मोठया प्रमाणात घडत आहेत. गेल्या पाच वर्षाचा विचार केल्यास या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून अनेकांचे मृत्यू ही सर्प दंशाने झाले आहेत.
शहापूर उपजिल्हा रुग्णालयातील प्राप्त माहिती ही संख्या कमी असली तरी ती अधिक आहे. कारण येथे आवश्यक उपचार यंत्रणा नसल्याने रुग्ण गंभीर झाल्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात वा इतर खाजगी रुग्णालयात नेले जाते. त्यामुळे तेथे जर मृत्यू झाला तर त्याची नोंद ही त्या रुग्णालयात अथवा सिव्हील रुग्णालयात होते. त्यामुळे या नोंदी येथे होत नसल्याने मृत्यू ची आकडेवारी कमी आहे.
कालच तालुक्यातील साठगाव हद्दीतील चिखली येथील सहा वर्षीय बालक देवराज देसले याचा सर्प दंशाने मृत्यू झाला. अंगणात खेळत असताना समोरून आलेल्या सापाने या बाळाचा सापाने दंश घेतला असता त्याला डोळखांब येथे उपचारासाठी नेले, मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातील त्यास मृत घोषित केले.या मृत्यूमुळे आता सर्पदंश हा मुद्दा आता ऐरणीवर आला आहे.