ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या विस्तारित रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर २०२५ उजाडणार आहे. संपूर्ण प्रकल्पाचे काम ४० टक्केच झाले असून या प्रकल्पाचा खर्च देखील आता ६४ कोटींनी वाढला आहे. रेल्वे आणि ठाणे महापालिका या दोन्ही यंत्रणांकडून या प्रकल्पाला गती देण्याचे काम सुरू असून २०२५ अखेर हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
ठाणे रेल्वे स्थानकामधून दररोज दररोज सात ते आठ लाख प्रवासी दररोज प्रवास करत असून संध्याकाळी तर लोकल पकडण्यासाठी नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन गाडी पकडावी लागते. ठाणे स्थानकावरील हा भार कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंडच्या दरम्यान नवीन रेल्वे स्थानकाचे काम रेल्वे आणि ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. २०१८ पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली असून आतापर्यंत केवळ ४० टक्के या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र आता या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दीड ते दोन वर्ष लागणार असल्याचा दावा पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.
नवे ठाणे स्थानक उभारल्याने या स्थानकामध्ये मुंबईला जाणाऱ्या गाड्या होम प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. तसेच कर्जत-कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. ठाणे स्थानकातील सुमारे ३१ टक्के आणि मुलुंड स्थानकातील २१ टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.
विशेष ३ मार्गिका
पहिली मार्गिका नवीन ज्ञानसाधना कॉलेजच्या मागून हायवे पूर्व द्रुतगती महामार्गाला जोडणार
दुसरी मार्गिका जुने ज्ञानसाधना कॉलेज मार्गावर अप-डाऊन
तिसरी मार्गिका मुलुंड चेक नाकामार्गे बाहेर पडणारी अप-डाऊन
झोपड्यांच्या सर्वेक्षणाला लवकरच सुरुवात
या विस्तारित रेल्वे स्थानकाच्या आड येणाऱ्या तब्बल १७० झोपड्यांच्या सर्वेक्षणाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर या सर्व झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्याचे नियोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. धर्मवीर नगर म्हणून हा परिसर ओळखला जात असून या झोपड्या हटवल्यानंतर विस्तारित रेल्वे स्थानकाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे.
६४ कोटींची वाढ
या संपूर्ण प्रकल्पात ३.७७ एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून १० एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३२७ कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका १४२ कोटी, तर रेल्वेकडून १८५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.२०१८ साली या प्रकल्पाचा खर्च हा २६३ कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये ६४ कोटींची वाढ झाली असून हा खर्च ३२७ कोटींवर गेला आहे.
असे असेल नवीन विस्तारित रेल्वे स्थानक...
संपूर्ण ठाणे स्थानक १४.८३ एकर जागेवर होणार असून त्यापैकी ३.७७ एकर जागेवर रेल्वेरूळ व तळमजला अधिक २ मजली इमारतीचे काम रेल्वे करणार आहे.
या स्थानकांवर एकूण तीन फलाटांपैकी एक होम प्लॅटफॉर्म असणार आहे.
या स्थानकात तीन पादचारी पूल असणार आहेत.
परिचालन क्षेत्राचे काम ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून होत आहे.
स्टेशन इमारतीसमोर १५० मीटर लांब व ३४ मीटर रुंद असा सॅटिस डेक असणार आहे.
२.५ एकर जागेमध्ये २५० चार चाकी व दोन चाकी गाड्यांची पार्किंग व्यवस्था असणार आहे.