वसई : जगातून सर्वाधिक २७ कोटी विद्यार्थी भारतातील एक हजार विद्यापीठातून शिकत आहेत. मात्र दुर्दैवाने आपल्याकडे शिक्षणाचा दर्जा सुमार असून, शैक्षणिक गुणवत्ता व्यवस्थापनाचा अभाव दिसून येतो. सबळ अशी शिक्षण व्यवस्था आणि विदयार्थी पुरक शैक्षणिक धोरण हे आपल्या देशापुढील सर्वात मोठे आव्हान असल्याचे आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ज्ञ, तथा बँगलोर येथील नॅकचे सल्लागार डॉ.जगन्नाथ पाटील यांनी म्हटले आहे.
‘शोध मराठी मनाचा’ या जागतिक मराठी अकादमीच्या विवा महाविद्यालयात पार पडलेल्या दोन दिवसीय जागतिक मराठी संमेलनात ‘सरस्वतीच्या प्रांगणात’ हा परिसंवाद मान्यवरांच्या उपस्थितीने चांगलाच रंगला. या परिसंवादात डॉ.पी.डी.पाटील (कुलपती, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठ-पिंपरी), डॉ.जगन्नाथ पाटील (आंतरराष्ट्रीय शिक्षण तज्ञ, बँगलोर) व अन्य मान्यवर उपस्थित होते.
शिक्षकाने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविताना आपला कस लावला पाहिजे, केवळ नोकरीतील सवलती व फायदे पाहणारे शिक्षक हे संस्थेची प्रगती साधू शकत नाहीत. मुबारक सय्यद सारखे जिल्हा परिषदेचे शिक्षक व्यवस्थेतील उणीवा दुर्लक्षित करून आपल्या कर्तृत्वातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधतात. असे शिक्षक शिक्षण संस्थेचे कार्य एका उंचीवर नेतात. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटेक तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी एका समर्पित शिक्षकास पर्याय ठरू शकत नाही, असेही या परिसंवादात बोलताना डॉ.जगन्नाथ पाटील यांनी सांगितले.
डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पाटील म्हणाले की, १९८३ साली माजी मुख्यंमत्री वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रात यापुढे शिक्षण संस्था खासगी पद्धतीने सुरू करण्याचा निर्णय घेतला. चौथी शिकलेल्या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी तेव्हा घेतलेले निर्णय त्यामुळे आजची शिक्षणाची सुव्यवस्था दिसून येत आहे, असे ते म्हणाले. डॉ.डी.वाय. पाटील व डॉ.पतंगराव कदम यांनी त्या काळी शिक्षण संस्था उभारताना अतिशय मेहनत करुन शिक्षण संस्था वाढविल्या. त्याकाळी महाविद्यालयांना प्राध्यापक मिळविणे, इंजिनिअरींग कॉलेजला मशनरी व तांत्रिक व्यवस्था मिळविणे कठीण होते.