भातसा धरणातून सिंचनाचे पाणी बंद; १०८ गावपाड्यांतील शेती संकटात

वारंवार कालवा फुटून नादुरुस्त होत असल्याने होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अत्यावश्यक दुरुस्ती कामे हाती घेत जलसंपदा विभागाने भातसा धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणारे सिंचनाचे पाणी तात्पुरते बंद केले आहे.
भातसा धरणातून सिंचनाचे पाणी बंद; १०८ गावपाड्यांतील शेती संकटात
Published on

शहापूर : वारंवार कालवा फुटून नादुरुस्त होत असल्याने होणारी पाण्याची गळती रोखण्यासाठी अत्यावश्यक दुरुस्ती कामे हाती घेत जलसंपदा विभागाने भातसा धरणातून शेतीसाठी सोडण्यात येणारे सिंचनाचे पाणी तात्पुरते बंद केले आहे. यामुळे भातसा उजवा तीर कालवालगतच्या शहापूर व भिवंडी तालुक्यातील सुमारे १०८ गावपाड्यांतील शेती पाण्याअभावी कोरडी पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी लावलेली दुबार भातशेती तसेच भाजीपाला लागवड पाण्याअभावी सुकून जाण्याच्या मार्गावर असून शेतकरी चिंतेत आहेत. भातसा उजवा तीर कालवा ठिकठिकाणी भगदाड पडल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भातसा धरणाशी जोडलेल्या उजव्या तीर कालव्याची एकूण लांबी ६७ किमी आहे. त्यापैकी सुमारे ५४ किमीपर्यंत भिवंडी तालुक्यातील सैतानी नदीपर्यंत कालव्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम अद्याप अपूर्ण आहे. सध्या कार्यरत असलेल्या या कालव्याद्वारे शहापूर व भिवंडी तालुक्यातील १०८ गावांतील जवळपास १,६०० हेक्टर जमीन ओलिताखाली येते.

दरवर्षी जलसंपदा विभागाकडून उन्हाळी हंगामात दुबार भातशेती व भाजीपाला लागवडीसाठी या कालव्यातून पाणी सोडले जाते. या पाण्यावरच अनेक शेतकऱ्यांचा जोडधंदा अवलंबून आहे. मात्र, कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीची कामे झाल्याचा दावा असतानाही पुन्हा ठिकठिकाणी भगदाड पडल्याने सिंचनासाठी सोडले जाणारे पाणी गळतीत वाया जात आहे.

शेतकरी हवालदिल

यंदा दुरुस्ती कामे उशिरापर्यंत सुरू राहिल्याने १ जानेवारीपासूनच पाणी सोडण्यात आले, तर दरवर्षी साधारण १५ डिसेंबरपासून पाणीपुरवठा सुरू होतो. त्यातच कालवा साखळी क्रमांक ३८ जवळ आवरे गाव परिसरात भराव खचल्याने पुन्हा दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे वारंवार सिंचनाचे पाणी बंद करावे लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गेल्या वर्षी लाखो रुपयांचा खर्च करून कालव्याच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, एवढ्या खर्चानंतरही पुन्हा दुरुस्तीची वेळ येत असल्याने आधी झालेल्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in