कल्याण हादरलं! एकतर्फी प्रेमातून १२ वर्षीय मुलीला चाकूने भोकसून तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

मुलगी बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या आई सोबत खासगी शिकवणीतून घरी येत होती. यावेळी जिन्यातून घरात जात असताना...
कल्याण हादरलं! एकतर्फी प्रेमातून १२ वर्षीय मुलीला चाकूने भोकसून तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. कल्याणच्या तिसगाव परिसरात एका बारा वर्षाच्या मुलीवर चाकूने हल्ला करण्याात आला आहे. एका तरुणानं या मुलीवर सात ते आठ वेळा वार केल्याने त्या मुलीला या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर परिसरातील नागरिकांनी या तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. आदित्य कांबळे असं या तरुणाचं नाव असून या हल्ल्यानंतर हा तरुण फिनेल प्यायल्यानं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काल(१६ ऑगस्ट) संध्याकाळी सात वाजल्यापासून आरोपी आदित्य दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांना संबंधित मुलगी घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता. यानंतर आदित्य(आरोपी) मुलगी राहते त्या सोसायटीत दबा धरुन बसला होता. मुलगी बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या आई सोबत खासगी शिकवणीतून घरी येत होती. यावेळी जिन्यातून घरात जात असताना आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला ढकलून देत मुलीवर चाकूने वार केले. यावेळी मुलीच्या आईने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोर आदित्य त्यांना जूमानला नाही.

यावेळी मुलीच्या छातीवर वार झाल्याने तिला गंभीर दुखापत झाली. यामुळे ती खाली कोसळली. यानंतर तिच्या आईने आरडाओरडा केल्याने सोसायटीतील रहिवासी घटनास्थळी पोहचले. यावेळी आरोपी आदित्य तेथून पळून जात होता. नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. गंभीर जखमी झालेल्या मुलीला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेलं. यावेळी उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर मुलाने मृत मुलीला दोन वेळा प्रेमाची मागणी घातली होती. मुलीने नकार दिला असल्याने त्याच्या मनात राग होता. त्या रागातून त्याने हे कृत्य केलं असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मागील काही महिन्यांपासून कल्याण पूर्व भागात कायद्याचा बोजवारा उडाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी याठिकाणी भर रस्त्यात एका तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला होता. तसंच दोन वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांवर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. तर आता एका बारा वर्षीय मुलीवर चाकू हल्ला करून तिचा खून करण्यात आला आहे. यामुळे या भागात कायद्याचे बारा वाजले असून पोलिसांचा कसलाच धाक राहीला नसल्याचं दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in