
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावईला जीवे मारण्याची धमकी देणारा एक ऑडिओ सध्या वायरल होत आहे. याला दुजोरा खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांसमोर दिला आहे. ही ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांकडून ठाणे मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली. कथित ऑडिओमध्ये महेश आहेर यांनी बाबाजी नावाच्या शुटरला सुपारी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर जितेंद्र आव्हाड माध्यमांसमोर म्हणाले की, "तो स्वत:च्या तोंडाने कबूल करतो आहे. एक गोष्ट मी टीव्हीवर माझ्या कुटुंबियांबद्दल पाहिली की, माझ्या मुलीला स्पेनमध्ये मारणार आहेत. त्यासाठी बाबाजी नावाचा शूटर असणार, असे तो क्लिपमध्ये बोलतो आहे.”
ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हंटले होते की, "मला सकाळी माझ्या एका मित्राने एक ऑडिओ क्लिप पाठवली. यामध्ये असे बोलणे होते की, माझ्या मुलीला स्पेनमध्ये शुटर लावून शुट करून टाकायचे. माझा जावई जर भेटला नाही तर त्यांच्या घराजवळ काहीतरी गोंधळ घालायचा म्हणजे ते आईवडीलांना भेटायला येतील. असे बरेच काही त्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. माझ्या कुटुंबावर गोळ्या झाडणारा माणूस अजून या जगात जन्माला यायचा आहे." असा आधार त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, "याशिवाय आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे मी ४० लाख दिवसाला जमा करतो, २० लाख वाटतो आणि सारखे त्याने बाबाजी आणि शूटर्सचे नाव घेतले आहे. क्लिपमध्ये बोलणाऱ्याचे नाव महेश असे आहे. त्याच्याविरोधात मी अजिबात तक्रार दाखल करणार नाही. कारण त्यात मनस्तापाशिवाय काहीच होणार नाही. फक्त जनतेला कळावे की, काय चालले आहे ते. फक्त चौकशी होईल. महाराष्ट्राची जनता काय म्हणते ते बघू मग समजेल आपली काय भूमिका असेल."