...ती माझ्या आयुष्यातील मोठी चूक; डॉ. जितेंद्र आव्हाड यांची स्पष्ट कबुली

केणी कुटुंबापासून दूर गेलो, दुसऱ्या कुटुंबाला जवळ केले, त्यांच्यावर अतिरेकी विश्वास टाकला, ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
डॉ. जितेंद्र आव्हाड
डॉ. जितेंद्र आव्हाडसंग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : केणी कुटुंबापासून दूर गेलो, दुसऱ्या कुटुंबाला जवळ केले, त्यांच्यावर अतिरेकी विश्वास टाकला, ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती, अशी स्पष्ट कबुली राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

कळव्यात, शिंदे गटात प्रवेश केलेल्या मंदार केणी यांच्या कार्यक्रमात आव्हाड बोलत होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या. माझ्या जवळ राहून जवळ असल्याचे नाटक करणाऱ्यांनीच माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पण राजकारणात माणुसकी महत्त्वाची असते, साथ दिली तर ती शेवटपर्यंत द्यायची असते,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

मनोहर साळवी यांच्याबद्दल माझ्या मनात आदर होता आणि पुढेही राहील. मंदार केणी हा माझा जवळचा होता, आहे आणि राहील. अशा शब्दांत त्यांनी मंदार केणीवरील विश्वास व्यक्त केला. तो इतरांप्रमाणे गद्दार नव्हता. त्याने माझ्यावरती कधीच फितुरी केली नाही. पक्ष सोडण्याचा निर्णय त्याने माझ्याशी बोलून घेतला आणि स्पष्टपणे सांगितले, असे आव्हाड यांनी नमूद केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आव्हाड यांच्या निकटवर्तीय ७ नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला होता. यात माजी नगरसेवक मिलिंद पाटील, त्यांची पत्नी मनाली पाटील, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी, महेश आणि मनिषा साळवी, सुरेखा पाटील, सचिन म्हात्रे यांचा समावेश होता. मुंबईतील मलबार हिल येथील मुक्तागिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला होता.

डॉ. आव्हाड आणि मंदार केणी यांची मैत्री कायम

या प्रवेशामुळे कळव्यातील आव्हाड यांच्या बालेकिल्ल्यात मोठी खळबळ उडाली. मात्र त्याच पार्श्वभूमीवर आव्हाडांनी शिंदे सेनेच्या युवा नेत्याच्या वाढदिवसाला उपस्थित राहून मंदार केणीचे कौतुक करत तो इतरांप्रमाणे गद्दार नव्हता, असे वक्तव्य करून आपल्या माजी सहकाऱ्यांवर अप्रत्यक्ष टोले लगावले. राजकीय पार्श्वभूमीवरही डॉ. जितेंद्र आव्हाड आणि मंदार केणी यांची मैत्री कायम असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. मैत्री निखळ आणि स्वच्छ असली की, तुटत नाही, असा ठाम विश्वास आव्हाड यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in