

ठाणे : शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याच्या कथित घटनेचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या विरोधाची पहिली ठिणगी ठाण्यात पडली असून, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी ठाणे महापालिका मुख्यालयासमोर काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान पत्रकारांनी काळ्या फिती बांधून खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत संबंधित पक्षाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून बाहेर पडून शिवसेना शिंदे गटात गेलेले खासदार संजय दिना पाटील यांच्या भांडुप येथील निवासस्थानी प्रतिक्रिया घेण्यासाठी पत्रकार गेले होते. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ तसेच ठाणे जिल्हा पत्रकार संघाच्या सदस्यांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालावा तसेच खासदार संजय दिना पाटील यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.