ठाण्यातील तलावपाळी परिसरात तरुणाईचा जल्लोष

ठाण्यातील तलावपाळी परिसरात तरुणाईचा जल्लोष

दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन तलावपाळी परिसरात करून कुरघोडीच्या राजकारणाला दिवाळीपासून सुरुवात झाली.

कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे ठाण्याच्या तलावपाळी आणि गोखले रोडवर होणारी दिवाळी पहाट साजरी होऊ शकली नव्हती, मात्र यंदा सर्व निर्बंध शिथील केले असल्याने रेकॉर्डब्रेक गर्दीत दिवाळी पहाट साजरी करण्यात आली. दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी, तरुणांचा उत्साह आणि सुरेल्या संगीताच्या जादूने तरुणाईची दिवाळी पहाट सोमवारी चांगलीच रंगली होती. तरुणाईचा तोच जल्लोष, तोच उत्साह, दिवाळीची आंघोळ, नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तलावपाळी तसेच राम मारुती रोडवर दिसून आला. दुसरीकडे शिंदे गटाकडून दोन ठिकाणी तर ठाकरे गटाकडून एक अशा तीन ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन तलावपाळी परिसरात करून कुरघोडीच्या राजकारणाला दिवाळीपासून सुरुवात झाली.

एकीकडे घरोघरी रांगोळ्यांचा सडा, पणत्यांची आरास, आकाशकंदिलांची रोषणाईने दिवाळी पहाटची सुरुवात झाली तर दुसरीकेड रोजच सोशल नेटवर्किंगमध्ये रममाण असणारी तरुणाई सोमवारी पहाटे उठून दिवाळी पहाट साजरी करण्यासाठी सज्ज झाली होती. ठाण्यातील तरुणांनी कोरोनाच्या दोन वर्षाचा अपवाद वगळता गेली कित्येक दशके दिवाळी पहाट साजरी करण्याची परंपरा टिकवून ठेवली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही तलावपाळी आणि राम मारुतीरोडवर तरुणाईचा दिवाळी पहाटचा जल्लोष दिसून आला.

तरुणाईच्या लक्षणीय उपस्थितीने आजची तरुण पिढी आजच्या फास्ट युगातही सण-उत्सव साजरी करण्याची परंपरा टिकवून ठेवत असल्याचे दिसून आले. दिवाळीच्या निमित्ताने सोमवारी शहरात मंगलमय वातावरण ठिकठिकाणी दिसून आले. मात्र, या वातावरणात खरा रंग भरला तो रस्त्यावर उतरलेल्या तरुणाईने, पारंपारिक वेशभूषेत,नटून थटून तरुणाई एकत्र आली होती. प्रत्येक जण आपल्या मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देत होते.

राम मारुती रोड प्रमाणे गडकरी रंगायतन, तलावपाळी, नौपाडा रोडवर देखील तरुणाईची गर्दी झाली होती. अनेक जणांनी सकाळी एकत्र जमून कौपिनेश्वरचे दर्शन घेतले व आपल्या दिवसाची सुरुवात केली. तरुणाईच्या दिवाळीच्या रंगात रंग भरले ते रॉक बँडने. तरुणाईचे मनोरंजन करण्यासाठी राम मारुती रोड येथे दिवाळी जल्लोष, तलावपाळी येथे मोक्ष रॉक बँड तर ओपन हाऊस येथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

ठाण्यात प्रचंड वाहतूककोंडी

दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी तलावपाळी लगतचे तीनही रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने वाहतूक इतर रस्त्यांवरून वळवण्यात आली होती तर दुसरीकडे एकाचवेळी हजारो

युवक - युवती तलावपाळी परिसरात एकत्र आले. त्याचबरोर प्रत्येकजण दुचाकी आणी चारचाकी गाडीने दिवाळी पहाटचा आनंद लुटण्यासाठी आल्याने ज्याला जिथे जागा मिळेल त्याठिकाणी पार्किंग स्थळ निर्माण झाले होते त्यामुळे ठाणे स्टेशनवरील मार्गावर सकाळ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत परिरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

ठाकरे शिंदे गटाची राजकीय कुरघोडी

यापूर्वी तलावपाळी परिसरात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने एकमेव दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत होते. मात्र यंदा शिवसेनेत फूट पडल्याने दिवाळी पहाट कार्यक्रम कुणाचा होणार यासाठी हे दोन गट न्यायालयात गेले होते,मात्र या कार्यक्रमासाठी दरवर्षी परवानगी घेणारे नितीन लांडगे हे युवासेनेचे विस्तारक आता शिंदे गटात गेले असल्याने त्यांना परवानगी देण्यात आल्याने शिंदे गटाला नेहमीची जागा मिळाली. त्यामुळे यंदा राजन विचारे यांनी आपल्या कार्यक्रमाची जागा बदलली आणि गडकरी रंगायतन समोरच्या रस्त्यावर कार्यक्रम घेतला दुसरीकडे शिंदे गटाच्या मीनाक्षी शिंदे यांनी चिंतामणी चौकात स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ठाण्यातील कार्यक्रमांकडे आदित्य ठाकरेंची पाठ

ठाणे शहरात ठिकठिकाणी नरक चतुर्दशीच्या निमित्ताने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले मात्र आदित्य ठाकरे कबूल करूनही ठाण्यात का आले नाहीत याची चर्चा सुरू आहे. ठाकरे सेनेने देखील दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आमदार आदित्य ठाकरे येणार असे होर्डिंग्ज ठाणे शहरात जागोजागी लावण्यात आले होते. कदाचित मुख्यमंत्र्यांना मिळाला तेवढा प्रतिसाद आपल्याला ठाण्यात आल्यावर मिळण्याची खात्री वाटत नसल्यानेच त्यांनी ठाण्यात येणे टाळले असावे अशी भीती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली आहे. ही बाळासाहेबांची हिंदुत्व जपणारी खरी शिवसेना आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in