कळवा रुग्णालयाची सेवा कोलमडणार? बाह्य रुग्ण सेवेवर कमालीचा ताण; दररोज दोन हजार रुग्ण तपासणीसाठी दाखल

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत चालली असून कामाच्या अतिरिक्त ताणामुळे रुग्णालयाची बाह्य रुग्ण सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे: ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत चालली असून कामाच्या अतिरिक्त ताणामुळे रुग्णालयाची बाह्य रुग्ण सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.

ताण सध्या वाढला आहे. पावसाळा सुरू झाल्याने ओपीडीवर सध्या विविध आजारांवर उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गर्दी होऊ लागली आहे. रुग्णालयात सध्या ४५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र ओपीडीवर येणाऱ्या रुग्णांचा ताण वाढला असून रोज २२०० हून अधिक रुग्ण येत आहेत. यात ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यापूर्वी येथील ओपीडीवर १५०० ते १७०० च्या आसपास रुग्ण उपचारासाठी येत होते. मात्र पावसाळ्यात विविध साथीचे आजार उद्भवतात. त्या पार्श्वभूमीवर येथील ओपीडीवर येणाऱ्या रुग्णांच्या संख्या २ हजार ते २२५० पर्यंत गेल्याचे दिसत आहे. यात थंडी ताप, डोळे येणे, कानदुखी, अतिसार आदी आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

अतिदक्षता (अपघात विभागात) हीच परिस्थिती आहे. २२ जुलैला येथे ३९८ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत, तर रोजच्या रोज नव्याने रुग्ण विविध आजारांवर उपचारासाठी दाखल होत आहेत.

या रुग्णालयातील बेडची क्षमता ५०० च्या आसपास आहे. २२ जुलैला ४७७ रुग्ण येथे उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. पावसाळा असल्याने आता साथरोगांच्या आजरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

आरोग्य यंत्रणा सज्ज

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था देखील आता साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. रुग्णालय प्रशासनाकडून पुरेसा औषधसाठा देखील उपलब्ध करून घेण्यात आला आहे. डॉक्टरांची टीम देखील सज्ज ठेवण्यात आली आहे.

सर्दी, ताप, खोकला आजाराचे रुग्ण अधिक

कळवा रुग्णालयात सध्या ओपीडीवर येणाऱ्या २२०० हुन अधिक रुग्णांमध्ये सर्दी, ताप, खोकला, अतिसार, डोळे येणे आदी रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे. ७० ते ८० टक्के रुग्ण हे सर्दी, तापाचे आणि व्हायरल आजाराचे दिसून आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in