

कल्याण : ठाणे जिल्ह्यात एका गर्दीने खचाखच भरलेल्या व्हॅनची सिमेंट मिक्सर ट्रकशी टक्कर होऊन ११ जणांचा बळी घेणाऱ्या अपघातप्रकरणी पोलिसांनी सिमेंट मिक्सर ट्रकच्या चालकाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली असून, नागरिकांनी अनधिकृत वाहनांमधून प्रवास करू नये, असे आवाहनही केले आहे.
स्थानिकांना 'शटल टॅक्सी' सेवा पुरवणारी ही व्हॅन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने जात असताना, सोमवारी सकाळी उल्हास नदीवरील नव्याने बांधलेल्या पुलावर समोरून येणाऱ्या 'ट्रान्झिट मिक्सर'शी तिची समोरासमोर टक्कर झाली. सिमेंट मिक्सर चालवणारा कमलेश यादव (२६) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड यांनी दिली.
अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करा
या भीषण अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, अवैध प्रवासी वाहतुकीवर कडक कारवाई, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करणे, वेगमर्यादेवर नियंत्रण, अपघातग्रस्तांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणे व एसटी बससेवा वाढवणे, अशा ठोस उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी होत आहे.