१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी

अंतर अवघे १५ किलोमीटर, पण ते पार करण्यासाठी वेळ तब्बल एक ते दीड तास..! कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांची सध्या हीच रोजची व्यथा बनली आहे.
१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी
१५ किलोमीटरसाठी दीड तास! कल्याण-बदलापूर महामार्गावर खड्डे, पाणी अन् कोंडी
Published on

उल्हासनगर : अंतर अवघे १५ किलोमीटर, पण ते पार करण्यासाठी वेळ तब्बल एक ते दीड तास..! कल्याण-बदलापूर राज्यमार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांची सध्या हीच रोजची व्यथा बनली आहे. उल्हासनगरमधील खड्ड्यांनी चाळण झालेले रस्ते, अर्धवट काँक्रीटीकरण, सखल भागांत साचणारे पाणी, रस्त्यावर उभी केली जाणारी वाहने आणि बेशिस्त वाहतुकीने या महत्त्वाच्या मार्गाचा अक्षरशः श्वास कोंडला आहे. रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी रस्ते प्रवासाचा पर्याय निवडणाऱ्यांसाठीही आता हा प्रवास वेळखाऊ आणि मनस्ताप देणारा ठरत आहे.

कल्याण स्थानक परिसरातील विविध कामांमुळे सुरू होणारी वाहतूककोंडी बदलापूरकडे जाणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलावर अधिक तीव्र होते. वालधुनी परिसरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतर प्रवास सुरळीत होतो; मात्र उल्हासनगरमध्ये प्रवेश करताच पुन्हा कोंडीचे चक्र सुरू होते. काजल पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या चौकात रस्त्याच्या सखल भागामुळे थोड्याशा पावसातही एक ते दीड फूट पाणी साचते. त्यामुळे वाहतूक एकेरी होत असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या पाण्याच्या लाटा थेट दुकानांमध्ये शिरत असल्याने स्थानिक व्यापारीही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढे शिवाजी चौकातील असमान रस्ता, फॉलोवर लाइन परिसरातील बेशिस्त वाहतूक आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकाकडे वळणाऱ्या चौकातील खड्ड्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट होते.

अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहनचालकांना खड्डे चुकवत कसरत करत प्रवास करावा लागत आहे. वारंवार होणारी कोंडी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासह वाहतुकीचे प्रभावी नियोजन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in