

मुंबई : कल्याण-बदलापूर विभागात प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामासाठी शनिवार, २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री १.४० ते पहाटे ३.४० या दोन तासांच्या कालावधीत कल्याण ते बदलापूरदरम्यान अप आणि डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर हा ब्लॉक असेल. त्यामुळे या कालावधीत कल्याण ते कर्जतदरम्यान लोकल सेवा उपलब्ध होणार नाहीत.
ब्लॉकपूर्वी बदलापूरसाठीची शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११.५१ वाजता सुटेल. तर कर्जतसाठीची शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता सुटणार आहे. सीएसएमटीच्या दिशेने जाणारी बदलापूर-सीएसएमटी शेवटची लोकल रात्री ११.२९ वाजता बदलापूरहून रवाना होईल.
ठाणे-कर्जत पहिली लोकल २९ नोव्हेंबरला पहाटे ५ वाजता ठाण्याहून सुटेल. तर कर्जत-सीएसएमटी लोकल पहाटे ३.३५ वाजता आणि अंबरनाथ-सीएसएमटी लोकल पहाटे ३.४३ वाजता सुटणार आहे. ब्लॉकदरम्यान चार मेल-एक्स्प्रेस गाड्या कर्जत-पनवेल-ठाणे मार्गे वळविण्यात येणार आहेत. यामध्ये भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस (११०२०), विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस (१८५१९), हैदराबाद-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२७०२) आणि होस्पेटे-सीएसएमटी एक्स्प्रेस (१११४०) यांचा समावेश आहे.