Kalyan : वकिलाची थकीत फी अखेर वसूल; ३५ हजार रुपये व ६ टक्के व्याज देण्याचा न्यायालयाचा आदेश

वकिलाच्या थकीत व्यावसायिक फीच्या वसुलीसंदर्भात कल्याण येथील सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
Kalyan : वकिलाची थकीत फी अखेर वसूल; ३५ हजार रुपये व ६ टक्के व्याज देण्याचा न्यायालयाचा आदेश
Published on

कल्याण: वकिलाच्या थकीत व्यावसायिक फीच्या वसुलीसंदर्भात कल्याण येथील सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायालयाने वकिलाच्या बाजूने दावा अंशतः दाखल मंजूर करत प्रतिवादीला ३५ हजार रुपये थकीत फीची रक्कम तसेच दावा केल्याच्या तारखेपासून ६ टक्के वार्षिक व्याज देण्याचा आदेश दिला आहे. नियमित दिवाणी दावा क्र. १२२/२०२४, अॅड. हरिष हरिदास नायर विरुद्ध उमेश रमेश भोईर या प्रकरणात ४ ऑगस्ट रोजी हा निर्णय देण्यात आला.

या प्रकरणात वादी अॅड. हरिष हरिदास नायर यांनी प्रतिवादी उमेश रमेश भोईर यांच्यासाठी कल्याण येथील न्यायालयात सुरू असलेल्या विवाह याचिका क्र. ६७८/२०२२ मध्ये वकील म्हणून काम केले होते. सदर कामासाठी ५० हजार रुपये व्यावसायिक फी निश्चित करण्यात आली होती. त्यापैकी १५ हजार रुपये प्रतिवादीने अदा केले होते; मात्र उर्वरित ३५ हजार रुपये फी थकीत राहिली होती. थकीत फीची वारंवार मागणी करूनही प्रतिवादीने रक्कम अदा केली नाही. त्यामुळे वादी अॅड.नायर यांनी थकीत फीच्या वसुलीसाठी दिवाणी दावा दाखल केला.

प्रतिवादी या प्रकरणात प्रतिवादीला न्यायालयीन समन्सची बजावणी करण्यात आली होती. मात्र, समन्स बजावूनही न्यायालयासमोर हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने प्रकरण (Ex Parte) चालविले. वादीतर्फे सादर करण्यात आलेल्या तोंडी तसेच कागदोपत्री पुराव्यांच्या आधारे वादीने आपला दावा सिद्ध केल्याचे एकतर्फी न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयाने वकिलाची एकूण फी ५० हजार रुपये निश्चित झाल्याचे, त्यापैकी १५ हजार रुपये अदा करण्यात आले असून ३५ हजार रुपये थकीत असल्याचे पुराव्यांवरून सिद्ध झाल्याचे निष्कर्ष नोंदवले. तसेच वादीचा पुरावा उलटतपासणी अभावी विना-आव्हानित राहिल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

वादीने थकीत रकमेवर १८ टक्के व्याजाची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने ती मागणी पूर्णतः मान्य न करता दावा दाखल केल्याच्या तारखेपासून वसुलीपर्यंत ६ टक्के वार्षिक व्याज देण्याचा आदेश दिला.

एक महिन्यात रक्कम अदा करण्याचे आदेश

न्यायालयाच्या अंतिम आदेशानुसार, प्रतिवादीने ३५ हजार रुपये ही थकीत रक्कम दावा दाखल केल्याच्या तारखेपासून ६ टक्के वार्षिक व्याजासह आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वादीला अदा करावी. तसेच दावा खर्चासह अंशतः मंजूर करण्यात आला आहे. वकिलांच्या व्यावसायिक फीच्या कायदेशीर वसुलीसंदर्भात कल्याण न्यायालयाने दिलेला हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात असून, वकील वर्गातही या निर्णयाची चर्चा होत आहे.

ज्या क्लायंटसाठी वकील न्यायालयात किंवा इतर प्राधिकरणांसमोर जीवापाड अभ्यास करून, मेहनत घेऊन त्यांची केस लढतात, त्यांच्याच विरोधात स्वतःची केस लढण्याची वेळ वकिलांवर येते, असे विचित्र क्लायंटही असतात, हे या प्रकरणातून दिसून येते. वकिलांची फी न देता त्यांची फसवणूक करणाऱ्या क्लायंटसाठी हा निर्णय मोठी चपराक आहे.

अॅड. हरिष हरिदास नायर

logo
marathi.freepressjournal.in