अनधिकृत फलक लावणाऱ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचेच अभय ?

कोणतीही परवानगी महानगरपालिकेकडून न घेता लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे शहराचे सौंदर्य धोक्यात येत आहे
अनधिकृत फलक लावणाऱ्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचेच अभय ?

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या १० प्रभाग क्षेत्राच्या हद्दीत अनधिकृत फलक लागलेले नेहमीच दिसत असतात. प्रामुख्याने त्यात राजकीय नेत्यांच्या शुभेच्छांचे तसेच जाहिराती म्हणून लावलेले फलक असतात. कोणतीही परवानगी महानगरपालिकेकडून न घेता लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे शहराचे सौंदर्य धोक्यात येत आहे.

मुंबई हायकोर्टाने गेल्या वर्षी अनधिकृत फलकांवर थेट गुन्हे नोंद करून फौजदारी कार्यवाही करण्याचे आदेश काढलेले असतानाही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आजवर एकही अनधिकृत फलक लावणाऱ्यांवर गुन्हा नोंद करून फौजदारी कार्यवाही केली नाही, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते भूषण पवार यांनी केलेल्या अर्जातून उघड झाली आहे. मुंबई हायकोर्टाने अनधिकृत फलकांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते, तरीही शहराच्या हद्दीत अनधिकृत फलकांचा सुळसुळाट असताना आजवर महानगरपालिकेने एकही गुन्हा नोंद न करून अनधिकृत फलकांना महानगरपालिकेचे अभय आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते भूषण पवार यांनी महानगरपालिकेकडे ११ एप्रिल रोजी महानगरपालिका हद्दीत आजवर अनधिकृत फलकांवर किती गुन्हे नोंद केले, म्हणून माहिती मागविली होती. ३० दिवसांत संबंधित अर्जाचे उत्तर अपेक्षित असताना महानगरपालिकेने १० प्रभाग ऐवजी ५ प्रभागांची माहिती उपलब्ध करून इतर ५ प्रभागांची माहिती दिली नाही. उलट महानगरपालिकेने अर्जदार भूषण पवार यांनाच महानगरपालिकेच्या दहा प्रभागात चौकशी करावी आणि माहिती घ्यावी, अशी अजब उत्तरे देऊन स्वत:वरील जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. संबंधित अर्जाबद्दल माहिती अर्धवट दिल्याने महानगरपालिकेकडे प्रथम अपील करून उर्वरित माहिती घेणार आहोत. त्याचसोबत गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची तक्रार ही राज्य माहिती अधिकार आयुक्तांकडे करणार असल्याचे भूषण पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in