कल्याण पालिकेचे CCTV कॅमेरे बंद

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तब्बल ४० कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेली सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा अक्षरशः शोभेची बाहुली ठरली आहे. डोंबिवली पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांवर बसविण्यात आलेले सर्वचे सर्व २७ कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हद्दीत केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तब्बल ४० कोटी रुपयांच्या निधीतून उभारलेली सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा अक्षरशः शोभेची बाहुली ठरली आहे. डोंबिवली पश्चिमेतील प्रमुख रस्त्यांवर बसविण्यात आलेले सर्वचे सर्व २७ कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही माहिती शिवसेना (शिंदे गट)च्या माजी नगरसेविका वृषाली रणजीत जोशी यांनी माहिती अधिकारातून उघड केली.

ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक दाट लोकसंख्या व नोकरदारांचे वास्तव्य असलेल्या कल्याण-डोंबिवली शहराला सुरक्षित शहर म्हणून महत्त्व आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वाहतूक शिस्तीकरिता स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली. मात्र, पश्चिम भागातील २७ कॅमेरे बंद असल्याने पोलिसांच्या कामकाजावर थेट परिणाम झाला आहे. चोरी, अपघात, गुन्हेगारी यांवर नियंत्रण ठेवण्याचे उद्दिष्ट या बंद कॅमेऱ्यांमुळे हाणून पाडले गेले आहे. डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ रोडवरील रेल्वे उड्डाणपुलालगत बांधकाम विकासकाकडून सुरू असलेल्या तोडकामामुळे पुलावरील छताचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांना पावसाळ्यात पुलावरून जाताना भिजत जावे लागत आहे. या तोडफोडीची जबाबदारी संबंधित विकासकावर टाकून त्याच्याकडून नुकसानभरपाई व दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणीही जोशी यांनी केली आहे.

पालिकेचे दुर्लक्ष

वृषाली जोशी यांनी संबंधित विभागाकडे वारंवार विचारणा केली असता मात्र टाळाटाळ करण्यात आली. शेवटी माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरात पश्चिम भागातील सर्व २७ कॅमेरे बंद असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. “शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न बिकट होत असताना पालिकेने तातडीने ही यंत्रणा दुरुस्त करून कार्यान्वित करावी,” अशी मागणी जोशी यांनी केली असून त्या लवकरच आयुक्त डॉ. अभिनव गोयल यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in