कल्याण-डोंबिवली: गुटखा बनविणाऱ्या मशिनसह सुमारे ८ लाखांचा गुटखा जप्त

चारचाकी वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकून अटक केली.
कल्याण-डोंबिवली: गुटखा बनविणाऱ्या मशिनसह सुमारे ८ लाखांचा गुटखा जप्त

डोंबिवली : चारचाकी वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या तिघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकून अटक केली. या तिघांचे दोन साथीदार फरार असून यांनी हाजीमंलग रोड कुसवली गावाजवळ अवैध गुटखा कारखाना सुरू केला होता. पोलिसांनी या कारखान्यावर छापा टाकत पावणेआठ लाखांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन आणि गुटखा बनविणारी मशीन जप्त करण्यात आली आहे.

कल्याण गुन्हे अन्वेषण विभागात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त (गुन्हे) शिवराज पाटील यांनी माहिती दिली. विराज सिताराम आलीमकर (२४), मोहम्मद उमर अब्दुल रेहमान (३५) आणि मोहम्मद तारीक अलीकादर खान (२१) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तिघांकडून गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहन व तसेच अवैध गुटखा असा एकूण ७,५८,१५० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्व येथे चारचाकी वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा वाहतूक करून घेवून जाणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचला. काही वेळाने बदलापूरच्या दिशेकडून काटईनाका दिशेकडे जाणारे एक चारचाकी वाहन थांबवून पोलिसांनी वाहन व गुटखा जप्त केला.

पोलीस कस्टडी रिमांड घेऊन तपास केला असता हे तिघे व दोन साथीदार यांनी सुरू केलेल्या कल्याण येथील हाजीमंलग रोड कुसवली गावाजवळ अवैध गुटखा बनविण्याचा कारखान्यावर छापा मारला. या कारखान्यातील अवैध गुटखा बनविण्याकरीता लागणारे साहित्य, २ मोठ्या मशीन व इतर कच्चा माल, सुंगधीयुक्त सुपारी, विमल पान मसाला, राजनिवास पानमसाला तसेच जेड एल- १ जाफरानी जर्दा तंबाखू व इतर कच्चा माल असा सुमारे १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in