KDMC मध्ये सत्तासमीकरणांना मोठी कलाटणी; मनसेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, भाजपवर कुरघोडी!

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) निवडणुकीनंतरच्या राजकारणात मोठा उलटफेर बघायला मिळाला असून, मनसेने थेट शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. सत्तास्थापनासाठी किमान ६२ नगरसेवकांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे ५३ आणि मनसेचे ५ असे मिळून सध्या आकडा ५८ वर पोहोचला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटातील ११ पैकी ४ नगरसेवक...
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) निवडणुकीनंतरच्या राजकारणात मोठा उलटफेर बघायला मिळाला असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) थेट शिंदे गटाच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेचे माजी आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी पक्षाच्या पाच नगरसेवकांच्या वतीने शिवसेनेला पाठिंबा देण्याची घोषणा आज (दि.२१) केली आहे. एकमेकांविरोधात निवडणूक लढल्यानंतर अचानक या दोन पक्षांच्या जवळकीमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणांना कलाटणी मिळाली आहे.

याआधी दिवसभरात शिंदे गटाच्या शिवसेनेचे सर्व ५३ नगरसेवक नवी मुंबई येथील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणीसाठी दाखल झाले होते. याच ठिकाणी मनसेचे पाच नगरसेवकही पोहोचले आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून शिवसेनेला अधिकृत पाठिंबा देत असल्याची घोषणा करण्यात केली.

भाजपवर कुरघोडी, आता असं आहे KDMC चं बदललेलं चित्र

भाजपकडून महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ मागितला जात असल्याने, शिवसेना स्वतंत्रपणे सत्ता स्थापन करण्याचा किंवा महायुतीत आपली भूमिका मजबूत करण्याचा पर्याय तपासत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. १२२ सदस्यांच्या कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदेंची शिवसेना ५३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरली आहे. भाजपला ५० जागा मिळाल्या असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ११, मनसेला ५, काँग्रेसला २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला १ जागा मिळाली आहे. सत्तास्थापनासाठी किमान ६२ नगरसेवकांची आवश्यकता आहे. शिवसेनेचे ५३ आणि मनसेचे ५ असे मिळून सध्या आकडा ५८ वर पोहोचला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे गटातील ११ पैकी काही नगरसेवकही शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यांचे ४ नगरसेवक 'नॉटरिचेबल' असल्याचे सांगितले जात आहे. हे चार नगरसेवक मनसेत सामील झाल्यास शिंदेसेना भाजपला सत्तेपासून रोखू शकते.

श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

यावर प्रतिक्रिया देताना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, “शहराच्या विकासाचा विचार करून मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.” महापालिकेत भाजपशिवाय शिवसेना सत्ता स्थापन करणार का, या प्रश्नावर, महायुती म्हणून शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली आहे आणि केडीएमसीत महापौर महायुतीचा असेल. महापौरपदाबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संयुक्तपणे घेतील, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, आगामी काही दिवसांत केडीएमसीतील सत्तेचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in