

कल्याण : एल-निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २४ तासांची पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. गुरुवार, १९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पुढील सूचना मिळेपर्यंत दर गुरुवारी ही कपात करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे राज्यातील जलसाठ्याचे ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत काटकसरीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
या कपातीचा परिणाम बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांवर अवलंबून असलेल्या कल्याण पूर्व-पश्चिम, कल्याण ग्रामीण, मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी तसेच डोंबिवली पूर्व-पश्चिम परिसरातील नागरिकांवर होणार आहे.
विशेष म्हणजे, पाणीपुरवठा बंद असलेल्या दिवशी आणि त्यानंतरच्या दिवशी महापालिकेमार्फत टँकरद्वारेही पाणीपुरवठा केला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तेवढाच पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.